Thursday, 4 November 2010

गाऊ त्यांना आरती....!!

 ----------------------------------------------------------
 दिवाळीचा फराळ , फटाके, नातेवाईकांच्या भेटी, सुंदर रोषणाई यात आपण न्हाऊन निघतो... सकाळचे अभ्यंग स्नान, सुगंधी उठणे यांची मजा अनुभवतो... आयुष्याच्या असंख्य वेदनांवर दिवाळीच्या रूपात फुंकर घातल्याचा आपल्याला भास होतो.... कारण आपण सुखी आणि सुरक्षित आयुष्य जगत असतो... ज्या काही मोजक्या पण समर्पित माणसांमुळे हे शक्य होत आले आहे, ती म्हणजे लष्कर आणि गुप्तचर संघटनांची माणसे... त्यांच्या योगदानाकडे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न.....
--------------------------------------------------


चित्रगुप्तासमोर एक माणूस उभा असतो...
त्याने आयुष्यात केलेल्या पाप-पुण्याचा हिशोब आणि लेखापरिक्षण सुरू असते...
त्याला काही प्रश्न विचारले जातात....
"तू आजवर अनेक माणसांवर हल्ले केलेस हे सत्य आहे?"
"हो..." समोरून शांतपणे उत्तर येते...
"तुझ्या आयुष्यात तू  स्वतःच्या पत्नी आणि मुलांकडे लक्ष दिलेले नाहीस, हे सत्य आहे ?"
"हो.." पुन्हा एकदा ठाम उत्तर.
"तू स्वतःच्या विवेक बुद्धीला पटत नसतानाही अनेक आदेश पाळले आहेस , बरोबर ?"
"हं..... बरोबर ! " आवाजाच्या लयीत जराही बदल न होता उत्तर येते..
"ऐन गरजेच्या वेळी तू तुझ्या जन्मदात्यांकडे लक्ष पुरवू शकला नाहीस हे सत्य ना ?"
"हो.. दुःखद आहे पण हे सत्य आहे..!" तितक्याच प्रांजळपणे उत्तर येते....

"मग आता तुला स्वर्गाचे दरवाजे बंद आहेत...! अशी पापे केल्याबद्दल तुला नरकात जावे लागेल.....!", चित्रगुप्त फर्मावितो.... आणि विचारतो, यावर तुझा काही प्रतिवाद ?
हा माणूस मंद हसतो.... आणि म्हणतो प्रतिवाद काहिही नाही... फक्त एक सांगायचे राहिले.... "मी भारतीय लष्करातील जवान आहे.!!"
चित्रगुप्ताचा ऑडिट रिपोर्ट तिथल्या तिथे बदलला जातो....
पण या एका "ब्लॅक ह्युमर" मधून भारतीय जवानांचे जीवन स्पष्ट होते........


                     शाश्वततेने अशाश्वततेचा आणि आव्हानांचा सातत्याने पाठपुरावा करणारे... भारतीयांच्या संरक्षणासाठी अविरत झटणारे... ऊन-वारा-पाऊस-बर्फ...{ आपल्यासाठी तीनच ऋतू असतात... पण सैन्यासाठी मात्र बर्फ हा स्वतंत्र प्रकार असतो... भारतात सियाचीन सारख्या ठिकाणी सैन्य -४० डिग्री ला कार्यरत असते...!!!} यांच्या निरपेक्ष डोळ्यात तेल घालून सीमांकडे लक्ष देणारे आणि कोट्यावधी भारतीयांच्या अपेक्षांचे ओझे सहजपणे आपल्या खांद्यावर वागविणारे आपले सैन्य.......

दिवाळीचा फराळ , फटाके, नातेवाईकांच्या भेटी, सुंदर रोषणाई यात आपण न्हाऊन निघतो... सकाळचे अभ्यंग स्नान, सुगंधी उटणे यांची मजा अनुभवतो... आयुष्याच्या असंख्य वेदनांवर दिवाळीच्या रूपात फुंकर घातल्याचा आपल्याला भास होतो.... कारण आपण सुखी आणि सुरक्षित आयुष्य जगत असतो... ज्या काही मोजक्या पण समर्पित माणसांमुळे हे शक्य होत आले आहे, ती म्हणजे लष्कर आणि गुप्तचर संघटनांची माणसे...
कशी असेल त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची दिवाळी..?

"खूपदा आम्ही घरीच नसतो... किंवा असलो तरी डोळ्यासमोर सातत्याने सीमांवरील परिस्थिती असते !", कॅप्टन पाटणकर सांगत होते. "फराळ, फटाके यांचे विशेष काही वाटत नाही... आणि असेही एका कारगील सारख्या युद्धात आम्ही उभ्या आयुष्याचे फटाके पाहून घेतलेले असतात...पण.... " बोलता बोलता त्यांच्या नजरेत उरातील शल्य व्यक्त करणारा ओलावा येतो... "खऱ्या अर्थाने आम्ही भाऊबीजेसारखा सण मात्र मिस करतो...!" उभ्या देशाशी रक्षाबंधन खेळणारी ही माणसे स्वतःच्या हक्काच्या बहिणीला मात्र वेळ देवू शकत नाहीत... आणि दुसरीकडे आपण मात्र ताईने किंवा दादाने मला हवी ती भेटवस्तू दिली नाही म्हणून चिड-चिड करत असतो....

"आम्हाला काय, आमची मुले घरी येतील तोच दिवाळी आणि दसरा..." अशाच एका अनाम वीराची आई हळवी होवून सांगत असते.. प्रत्येक दिवाळीला फराळ केला तरी तो घशाखाली उतरत नाही... आठवण येत रहाते... कधी लाडक्या लेकाऐवजी त्याची मित्रमंडळी घरी येतात.... मग मात्र बरे वाटते... ते मित्रही आम्हाला आई आणि बाबा म्हणूनच हाक मारतात.... मोट्ठी पोकळी भरून निघाल्यासारखी वाटते.. आई बोलतच रहातात.. नकळ आपणही त्यांना आई-बाबा म्हणू लागलेलो असतो...
 
  नुकताच लष्करात लेफ्टनंट म्हणून जॉईन झालेल्या विक्रांत बापट यांच्या आई सांगत होत्या... यावेळी तर विक्रांत पुण्याला आहे... पण एव्हढ्या जवळ असूनही आमची भेट मात्र होईलच असे नाही... उलट यंदा विक्रांतच्या मित्रांनीच फर्माईश केली आहे.. करंज्या, लाडू अशा पदार्थांची... त्यांमुळे ते पाठवणार आहे... तेव्हढाच आनंद आणि समाधान ! आई भरभरून बोलत असतात.... आपण मंत्रमुग्ध झालेलो असतो... स्वतःच्या आयुष्यातील सुखांचे अर्थ आणि सखोलता शोधत..!

   एकीकडे , कुटुंबांची अशी भावना तर , दुसरीकडे अरूणाचल मधील केंगसुंग दामो ह्या एडीसीची कहाणी... "ऐन भारत-चीन युद्धाच्या धामधूमीतला जन्म.. तोही तावांग मधील... तेव्हाही दिवाळीच होती... पण त्यावेळी वेगळ्या फटाक्यांचा संस्कार झाला... आणि कायमचाच ! त्यातूनच आयुष्यात भेटणाऱ्या प्रत्येकाला संवाद साधण्याच्या आधी ’जय हिंद’ म्हणायची सवय लागली अन्‌ त्याच सहजतेने सरकारच्या अरूणाचलकडे होणाऱ्या दूर्लक्षाकडे पहाण्याचीही आदत बन गयी..!" दामो सांगत असतात... आज पन्नास वर्ष व्हायला आली तरी इशान्येकडे होणाऱ्या भारताच्या दूर्लक्षाची अखंड परंपरा आणि चीन संदर्भातील  धोरणांचे अंधत्व कायम आहे...

    एकिकडे समोर उभ्या असलेल्या पराक्रमाच्या आणि इच्छाशक्तीच्या जिवंत मूर्तीकडून आपल्याला इतिहासाचे ज्ञान होत असते.. आणि दुसरीकडे आपण इतिहासाची वर्तमानाशी सांगड घालत असतो... परिणाम ? समोरची मूर्ती कायमच हसरी आणि आपल्या नशिबी मात्र हतबलता !

काही "नशीबवान" घरात मात्र आपल्याला उत्साहाचे वातावरण दिसून येते.. तेथील नजराच सांगतात.. की ही आमची सर्वार्थाने दिवाळी आहे... आपणही नकळत आपली दिवाळी साजरी करू लागतो... त्या घरात एकाच वेळी, येणाऱ्या पाहुण्यांची सरबराई केली जात असते.. कुटुंबाच्या सदस्यांना एकमेकांशी संवाद साधायचा असतो... अल्प उपलब्ध वेळात घरी आलेल्या "लाडक्यांचा" सहवास मुक्तपणे लुटायचा असतो.. आणि तरीही एक प्रकारची विलक्षण संयतता घरात आढळते.....

भगवद्गीतेचा दूसरा अध्याय आपण अनुभवत असतो....
भारताच्या सैन्याचा अजोड त्याग, त्यांचा पराक्रम, त्यामागे त्यांच्या कुटुंबीयांचे असलेले योगदान आपल्याला अस्वस्थ करून सोडते..
शत्रू नाशाची नरक चतुर्दशी, संरक्षणाचे लक्ष्मीपूजन आणि पराक्रमाचा पाडवा आपल्याला एका गीताच्या ओळी आठवून देतो...

"संगरी विराग्रणी जे धैर्यमेरू संकटी
जन्मले या भारती...
गाऊ त्यांना आरती... गाऊ त्यांना आरती...!!!"

No comments:

Post a Comment