आज २६ नोव्हेंबर...
आज ताज जवळ हजारो "गर्व गीते" , गर्भगळित होणाऱ्यांकडून गायली जातील.. बॅनरबाजी होईल.. "शांततायात्रा" आयोजित केल्या जातील... भारतातील आणि मुंबईतील "मेणबत्ती" उद्योगाला तेजी येईल... शासकीय नेते दहशतवादविरोधी भूमिका आक्रमकपणे मांडताना दिसतील... सरकार दहशतवाद्याना "ठेचून" काढण्यास कसे समर्थ आहे हे वारंवार सांगितले जाईल....
रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले, असे म्हणणाऱ्या चापेकर बंधूंना टिळकांनीच विचारले होते... "अरे तुम्ही असे म्हणता खरे, पण मग तो रॅंड अजून जिवंत कसा ?".. आज लोकमान्य टिळक हवे होते... त्यांनी आवर्जून विचारले असते... "अरे एव्हढ्या बाता मारता, तर तो कसाब अजून जिवंत कसा ?...."
या देशाला नेमके काय झाले आहे तेच कळत नाही... देशालाच कशाला, तुम्हा-आम्हाला किंबहूना मला काय झाले आहे तेच नाही कळत....
या देशात इतका मोठा नरसंहार अवघ्या दोन दिवसात होतो आणि या घटनेला दोन वर्षही उलटत नाहित तोच केंद्रिय दक्षता आयोगाच्या आयुक्तपदी नियुक्त झालेल्या अधिकाऱ्याची राज्य दक्षता आयोगापुढे चौकशी सुरु असल्याचे लक्षात घेऊन, सर्वोच्च न्यायालय या नियुक्तीवर आक्षेप नोंदविते.... आपण शांतच असतो...
या घटनेवेळी राज्याचे गृहमंत्री असणारे आमदार त्यानंतरच्या काळात झालेले गडचिरोलीमधील नक्षलवाद्यांचे हल्ले पचवूनही पुन्हा एकदा तेच पद ग्रहण करतात.. कसाबला कोठडीत जाऊन भेटतात... आणि त्याच देशात- त्याच राज्यात तुरूंगातून सुटलेल्या संजय दत्तशी हस्तांदोलन केल्याबद्दल एका हवालदाराला निलंबित करण्यात येते...
आपण शांतच असतो...
कशेळीसारख्या एक खेड्यात एका दुपारी अचानक एक बोट येते... तिच्या हालचाली संशयास्पद वाटतात.. समुद्रकिनाऱ्यावर उपस्थित तरूण सावधपणे पोलिसांना बोलावतात.. आणि कोणत्याही चौकशी शिवाय बोट सोडून दिली जाते... कसाब आणि मंडळी अशाच बोटीतून येवून काही दिवस पोलिसांसह मुंबईकराना वेठिस धरतात याचा पोलिसांना इतका सहज विसर पडतो..
आपण शांत असतो...
२६/११ रोजी कसाब आणि त्याच्या साथीदारांना बधवार पार्कमध्ये रात्री ८:४० वाजता स्थानिक मच्छिमार बांधवांकडून हटकले जाते... मात्र मुंबईतील पहिला गोळीबार रात्री ९:३७ वाजता होतो... म्हणजे जवळ-जवळ एक तास अतिरेकी मुंबईमध्ये मोकाट फिरत असतात.. तरीही अतिरेक्यांच्या स्थानिक "काँटॅक्ट्ची" शक्यता पोलिसांकडून ठामपणे फेटाळली जाते... आणि गंमत म्हणजे बधवार पार्क पासून सीएस्टी स्थानक वगळता अन्य सर्व हल्ल्याची ठिकाणे ही चालत १० मिनीटांच्या अंतरावर असतात.. आपल्याला हे सारे उघड्या डोळ्यांनी दिसत असते,पण ...
आपण शांतच असतो...
या हल्ल्यात शहीद झालेल्या अशोक कामटे यांच्या पत्नी विनिता कामटे ओरडून-ओरडून काही प्रश्न विचारतात.. पुस्तक रूपाने मांडतात.. कामटे यांना मुंबई पोलिसांची न मिळू शकलेली मदत, शहीद करकरे यांचे गायब झालेले "तथाकथित" बुलेटप्रूफ जॅकेट... ओंबाळे कुटुंबियांना न मिळालेली मदत... या साऱ्या गोष्टींनी आपण आतून हलून जातो.. पण...
आपण शांतच असतो...
२६/११ च्या घटनेचे ताशेरे आणि त्या अपयशाचे खापर सहजरित्या आपल्या गुप्तचर यंत्रणांवर फोडले जाते.. आपण मारे सतर्कतेच्या आणि दक्षतेच्या गप्पा मारायच्या.. आणि शेजारच्या माणसाशी साधे बोलायचे कष्ट आपण रेल्वेमध्ये प्रथम श्रेणीच्या डब्ब्यात घ्यायचे नाहीत... ही आपल्याच आजूबाजूला दिसणारी "सतर्कता" आपण टिपत असतो... पण..
आपण शांत असतो...
मला एक कविता आठवते....
".....then they came for me"
---------------------------------------
first they came for the jews
and i did nothing, because i am not a jew
then they came for the communists
and i did nothing because i am not communist
then they came for trade unionists
and i said nothing because i am not a trade unionist
and then they came for me
and there was no one left to speak for me.....
आपली शांतता मला या दिशेने जाणारी वाटते...!
शहीदांना श्रद्धांजली म्हणून आरती गाण्यापेक्षा, मेणबत्त्या लावण्यापेक्षा, सरकारला दोष देण्यापेक्षा आपण काही वेगळे करूच शकत नाही का ? रस्त्यावरून जाताना न थुंकणे, कचरा रस्त्यावर न टाकणे, किमान आपल्या आसपास वावरणाऱ्या व्यक्तींचे निरिक्षण करणे, सैनिकांच्या जीवनाकडे केवळ "ईश्वरी" म्हणून न पाहता ती जीवनमुल्ये अंगी बाणवणे, किमान वाहतुकीचे नियम पाळणे आणि रस्त्यावर गोंधळाचे वातावरण निर्माण होणार नाही याची काळजी घेणे....... आपण इतक्या साध्या गोष्टीही करू शकत नाही का ? परिस्थिती बदलली पाहिजे म्हणून बोंबलण्यापेक्षा ती चिघळणार नाही याची साधी काळजी घेणे सोपे नाही का ? पण...
आपण शांतच असतो....
कोणे एके काळी, स्वातंत्र लढ्यात मोहनदास गांधीजी असे म्हणाले होते..
की, एकाच वेळी उभा भारत देश एकाच वेळी थुकला जरी, तरी हे गोरे त्यात वाहून जातील...
आपण इतर वेळी रस्त्यांवर पचापचा थुकतो... पण एकाच वेळी थुकायला जमेल.... ?
can we....????
No comments:
Post a Comment