दैनंदिन आयुष्य जगताना मला काही प्रश्न पडत रहातात.. त्यांची उत्तरे "पकड़ण्या एव्हढी" माझी चिमुकली मूठ बळकट नाही... पण त्यांचा योग्य वेळीच परामर्श न घेतल्यास ते किती भीषण रूप धारण करू शकतात , याचे चित्र माझ्या मनावर मी चितारु शकतो... तेच हे प्रश्न....!!!
१] विविध पाश्चिमात्य देश आणि आपण यांच्यात काही ठळक साम्यस्थळे आहेत का ?
२] शिक्षण आणि शेती ही भारतातील किंवा कदाचित जगातील सर्वात “ग्लॅमरहीन” क्षेत्रे आहेत.. पण मानवी आयुष्याचा विचार करता ही खूप प्राथमिक स्वरुपाची.. पायाभरणी करणारी क्षेत्रे आहेत.. मग या fields चे पुनरुज्जीवन करण्यासाठी काय- काय करावे लागेल.. ?
३] महात्मा गांधी यांच्या भूमिका पहाताना मला एक गोष्ट जाणवली.. ती म्हणजे गांधीजींनी समूह / संघ / सहकार यांची भारतीय जनमानसावर सक्ती केली नाही.. उलट त्यांनी निवडीचे स्वातंत्र्य जनतेला बहाल केले.. खऱ्या अर्थाने त्यांची आंदोलने ही लोकशाहीची प्रतिमा म्हणावीत अशी ठरली.. कदाचित भारतीय मानसिकतेमध्ये संघभावनेला अथवा समूहाने एकत्र काम करण्याला अल्प स्थान आहे अस म्हणता येवू शकेल का ? विशेषतः वयक्तिक सत्याग्रहाच्या संदर्भात... आणि नंतरही भारतात कामगार चळवळींच्या एकूणच यशपयशसंदर्भात....
४] history repeats itself with minor changes , अस म्हणतात.. पण मग भारताच्या वर्तमानातील अनेक प्रश्नांवर आपण अन्य देशांकडे पहाण्यापेक्षा आपल्याच इतिहासात उत्तरे शोधू शकतो का ? कशी ? इतिहासाचा अभ्यास कसा करावा ? आणि जर हे शक्य असेल तर आजवर तसे प्रयत्न झाले आहेत का ? कुठे ? झाले नसल्यास कोणत्या अडचणींमुळे हे होवू शकले नाही?
५] पाश्चिमात्यांचे अंधानुकरण आणि त्यांच्या संकल्पनांचा डोळस स्वीकार यातील फरक कसा ओळखावा ? आणि मग अंधानुकरण कसे थोपवावे ?
६] दूर्दैवाने एकूणच शिक्षण पद्धतीत योगी अरविंद यांच्या एकूणच कार्याचे वर्णन अभावानेच आढळते.. क्रांतीकारक ते अध्यात्म हा त्यांचा प्रवास.. किंवा या संकल्पनांमध्ये त्यांनी पाहिलेले अद्वैत.... त्याबद्दल काही सांगाल का ?
७] एका लेखात आणि एक व्याख्यानात मी असे वाचले की, डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे या भारतीय क्रांतीकारकाने , स्वतंत्र भारतात प्रवेश नाकारल्याने, मॅक्सिको येथे जावून तेथे महर्षी पराशर यांच्या कृषी विषयक ग्रंथांच्या मदतीने शेतीमध्ये क्रांती घडवून आणली. किंबहूना, आजही त्या देशात पराशर ॠषींच्या ग्रंथाचा शेतीविषयक अभ्यासक्रमामध्ये समावेश आहे... मग भारताच्या शेतीविषयक अभ्यासक्रमामध्ये असा समावेश का होत नसावा..?
८] कार्ल मार्क्स हे थोर विचारवंत होते.. उभे जग भांडवलवादाच्या “तावडीत” असेल तेव्हाच हे तत्वज्ञान सर्वाधिक लागू होते किंवा तशी शक्यता निर्माण होते... मग या न्यायाने तर मार्क्सवादाचा सर्वात जास्त प्रभाव अत्ताच्या जगावर पडणे अपेक्षित आहे.. जागतिक धोरणांवर समाजवादाचा प्रभाव असणे ही गरज आहे.. अशावेळी काळाने दिलेली ही सुवर्णसंधी ओळखण्यात भारतातील समाजवादी चळवळ यशस्वी होते आहे का..? नसल्यास का नाही ? की कुठेतरी ही या चळवळीच्या मनात आलेली “हतबलता” reflect करते आहे..? I mean what according to you is the relevance of these ideologies in current context..?
९] काश्मीर आणि जेरुसलेम ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू मानता येवू शकतील का ?
१०] हमीद दलवाई, नरहर कुरुंदकर यांसारख्या विचारवंतांनी केलेले इस्लामचे परिक्षण आणि सध्या जहाल हिंदुत्ववादी विचारवंतांनी केलेले समीक्षण यात साम्य आढळते.. तेव्हा खरोखरच इस्लाम मधील वहाबी पंथ हा जगासमोर धोका आहे हे सत्य मानणे भारतात का शक्य नाही ? किती वर्षे आपण सत्यापासून पळ काढणार ?
११] भारतातील हिंदू मुस्लिम प्रश्न आपल्याला reframe करता येणे शक्य आहे का ? म्हणजे हा प्रश्न हिंदू मुस्लिम संबंध नसून , मुस्लिमांबद्दल हिंदूंचा दृष्टीकोन कसा असावा याबद्दल हिंदूंमध्येच असलेले मतभेद आहे , अस म्हणता येईल का ? आणि त्यातून यावर उपाय शोधता येतील का ?
१२] आजही भारतात दुर्दैवाने राष्ट्रनिष्ठ म्हणवली जाणारी मंडळी समाजवाद / सर्वसमावेशकता यांपेक्षा संपूर्ण त्यागशीलतेकडे पहातात. तर समाजवादी म्हणविली जाणारी मंडळी राष्ट्रवाद / धर्म / संस्कृती असे शब्द अस्पृश्य मानतात. या द्वैत भावनेचा भारताच्या लोकशाहीच्या यशस्वीतेवर नकारात्मक परिणाम होत असेल का ? यावर काही उपाय ?
१३] ग्रामीण भारताच्या विकासाची आवश्यकता आहे असे आपण म्हणतो. प्रत्येक गावाचे असे एक वेगळेपण असते. त्या गावाची स्वतंत्र संस्कृती असते. अशा वेळी जगाने मानबिंदू ठरवलेली सुत्रे त्या गावावर विकास म्हणून लादण्यापेक्षा आपल्याला कुठेतरी "गावाच्या शक्तीस्थानांवर" त्या गावाला उभे करता येईल का ? म्हणजे मार्केटिंग, निसर्ग , दळण-वळण , माहिती तंत्रज्ञान या सगळ्या आघाड्यांवर proactively रचना करता येईल का? तसेच , ग्राम विकासाइतकीच "शहरी प्रतिगामित्वाची" गरज आहे असे म्हणता येईल का ?.....
मला हे प्रश्न का पडतात नाही माहीत, पण मला यांची उत्तरे शोधता येतील ?
No comments:
Post a Comment