आयुष्यात येणारे अनुभव हे कित्येकदा उन्मळून टाकणारे असतात... वारंवार होणारे अन्याय, अधिकारपदावरील व्यक्तींकडून न्याय मिळण्याच्या मावळत्या शक्यता, सातत्याने होणारे पराभव, गाडाव्याशा वाटणाऱ्या इच्छा, अगदी जीवनावरूनच उडालेले मन या साऱ्यानंतरही आयुष्य सुरुच राहतं... अंधाराच्या साम्राज्यानंतर, प्रकाशाची कोणतीही आशा उरलेली नसताना ज्याप्रमाणे सूर्यबिंबाच्या ज्वाळा अंतरी उमटतात... तद्वतच मानवी अंतःकरणातही लढाऊ बाणा चेतवणाऱ्या ज्वाळा उमटत अस्तील का... ?
अंतरातील ज्वाळा.....
कोठून येती आव्हाने, कोठून येती अन्यायमाला
न उमजे, तरी अंतरी राहती उभ्या कोठून धगधगत्या ज्वाला... ?
शुक्लपक्षी आशा कलेकलेने वृद्धिंगत होई
कृष्णपक्षी निराशेचे सावट नभ झाकोळून जाई
ना चांदण्या, ना चंद्र नभी असा उद्दाम क्षणही आला
नुमजे तरी अंतरी उभ्या राहती कोठून धगधगत्या ज्वाला... ?
प्रणयाच्या धुंदीतून पहाटे बाहेर पडता रात्र
सावळ्या नभी उमटते गुलाबी लकेर अंशमात्र
जन्मास येई अनुदिनी तेजस्वी बालक कोवळा
नुमजे अंतरी उभ्या राहती कोठून धगधगत्या ज्वाला... ?
स्वप्न पडते निद्रेस जेव्हा मंगल पहाटेचे
निसर्ग नयनी ओघळती ठिपके दवबिंदूंचे
अंधाराच्या रस्त्यावर रवीरथ प्रकाश फेकीत आला..
नुमजे अंतरी उभ्या राहती कोठून धगधगत्या ज्वाला... ?
अन्यायाने पिचतो देह, पराभवाने कोमेजते तन
हतबल होते, निराश होते उत्साही-सृजनशील मन
तरिही पेटून उठतो देह.. अन् चेतवितो बंडखोर वृत्तीला
नुमजे अंतरी उभ्या राहती कोठून धगधगत्या ज्वाला.... ?
No comments:
Post a Comment