प्रिय अरुंधती ताई, नमस्कार !
तसा आपला फारसा संबंध नाही अथवा आपली ओळखही नाही ! पण एकूणच लेखकाला आपल्याशी संवाद साधायला ओळख लागतेच असे दिसत नाही. शिवाय, आपण "लेखकांच्या आवाजावर बंधने" आणण्यास ठाम विरोध करणाऱ्या ! त्यामुळे थोडा संयमाचा बांध फुटला तरी, तो माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे, हे समजून घेण्याइतपत उदात्तपणा आणि औदार्य आपण दाखवाल, याची मला खात्री आहे.....!!
आणखी एक, तुम्हाला पत्राच्या सुरुवातीस "प्रिय" म्हणालो कारण, अजूनही आम्ही सुसंस्कृतपणा सोडू शकत नाही, अन स्त्रीचा सन्मान न राखणे ही आमच्या "स्वतंत्र आणि अभिव्यक्तीचा आदर राखणाऱ्या राष्ट्राची" शिकवणही नाही.
तर, नमनाला घडाभर तेल घालून झाल्यानंतर आता मूळ मुद्द्यावर येतो. आपण परवा काश्मीर बद्दल अप्रतिम मुक्ताफळे उधळलीत.... काय तर म्हणे, " ऐतिहासिक दृष्ट्या काश्मीर हे अखंड भारताचा कधीही घटक नव्हते. हे सर्वमान्य आणि स्वयंसिद्ध सत्य आहे. { ??? } आणि हे सत्य सरकारनेही स्विकारले आहे... त्यामुळे काश्मीर मधील लक्षावधी जनतेची स्वतंत्र होण्याची इच्छा न्याय्य आहे...!!!! "
फार आनंद वाटला... त्यातही हे विधान आपण श्रीनगर या शहरातून केलेत... त्याने अधिकच बरे वाटले. तुमची वाक्यरचना, शब्दांची निवड एक्दम फक्कड आहे.. फक्त काही गोष्टी तुमच्या नजरेतून निसटल्या ! त्यांची जाणीव करून देण्यापूर्वी, मला तुमचे अभिनंदन करावेसे वाटते... अखेरीस, भारत हे एक राष्ट्र आहे आणि ते अखंड आहे तसेच ऐतिहासिकदृष्ट्या हे सत्य आहे, हे आपण मान्य केलेत !!! केव्हढी मोठी क्रांती ही ? विचाराने कम्युनिस्ट असूनही असे आपण म्हणालात याने मला नितांत आनंद झाला.. आता एक गंमत सांगतो, ज्या श्रीनगरात बसून आपण हे विधान केलेत, त्या नगराला मौर्य साम्राज्यातील कर्तृत्ववान राजा सम्राट अशोक याने वसविले आहे... फक्त याला इतिहास म्हणता येईल का, हे मला निश्चित सांगता येत नाही... कारण तुमचा ऐतिहासिक कालखंड नेमका कधीपासून सुरू होतो, त्या बद्दल नेमकी एकवाक्यता नाही...
आता आपल्या या विधानांबद्दल माझ्या या काही भाबड्या शंका... { बाय द वे, आम्हा पामरांच्या असतात त्या भाबड्या शंका... तुमची असतात ती अभ्यासपूर्ण मते, विवेकनिष्ठ विवेचने...... अल्पसंख्यांकांवर होतो तो अन्याय... बहुसंख्यांकांवर होतो तो त्यांच्या युगानुयुगांच्या चुकांचा परिणाम.... हे सत्य आता आम्हीही स्विकारले आहे.... }
अखंड भारताची नेमकी ऐतिहासिकदृष्ट्या आणि व्यावहारिकदृष्ट्या घटक असलेली राज्ये कोणती , ती यादी आपण प्रसिद्ध कराल का ? मूळात भारत अखंड होता, या आपल्या विधानात तो कधीपासून याचा उल्लेख नाही. आमच्या [गैर] समजूतीप्रमाणे १५ ऑगस्ट, १९४७ पर्यंत भारत हा एकसंध आणि अखंडच होता... शिवाय, ब्रिटिशांच्या भारतविषयक धोरणांमध्येही काश्मीरला वगळले गेल्याचे ऐकिवात नाही. अथवा तोपर्यंत पाकिस्तानचा तसेच काश्मीरचा उल्लेख ब्रिटिशांच्याही परराष्ट्र धोरणांमध्ये स्वतंत्रपणे आलेला नाही. म्हणजे, सम्राट अशोकापासून सुरू झालेली काश्मीरची भारतासह असलेली अखंडता आजपर्यंत कायम आणि एकसंध रहाते, अशी आपली आम्हा भारतीयांची श्रद्धा. आणि यालाच सर्वमान्य सत्य म्हणत असावेत.... कदाचित आपली सर्वमान्य या शब्दाची व्याख्या वेगळी असेलही, तर कृपया तीही स्पष्ट करावी...
आता त्या पुढील मुद्दा : काश्मीर हे भारताचा एकसंध भाग नव्हते हे सरकारनेही स्विकारलेले सत्य आहे, असे आपण म्हणता ! आजवर काश्मीरचे राज्यपाल नेमके कोणी नेमले ? काश्मीर विषयक समस्या आणि तेथील खटले अंतिमतः कोणाच्या आणि कोणत्या न्यायालयापुढे चालविले जातात तसेच त्यासाठी कोणते दंडविधान वापरले जाते ? आजवर काश्मीरला आर्थिक निधी कोणी आणि कोणाच्या पैशांमधून दिला ? काश्मीरमध्ये निवडणूका कोणाच्या देखरेखी-खाली होतात ? फारूक अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला हे पितापुत्र भारताच्या केंद्रिय मंत्रीमंडळात होते, ते काश्मीर हा ऐतिहासिकदृष्ट्या भारताचा भाग नाही म्हणूनच नाही का ? { ग्लोबलायझेशन मुळे आता कोणत्याही देशाचा नागरिक कोणत्याही देशाच्या मंत्रीमंडळात जातो का , आणि असे असल्यास राष्ट्र ही संकल्पना न मानणाऱ्या कम्युनिस्टानी याविरोधत काही आंदोलन केले आहे का , हा प्रश्न विचारण्याचा मोह मी टाळतो आहे... }
या साऱ्या प्रश्नांवर मला समाधानकारक उत्तरे सापडू शकली नाहीत. आणि या साऱ्यानंतरही, काश्मीर हे भारताचे नव्हते हे सरकारने स्विकारलेले सत्य आहे असे म्हणायचे धाडस करता येईल का ? तशा बाई तुम्ही धाडसी आहात.... तुम्ही कदाचित धाडस करालही ! नव्हे खर तर केलेही !!!
आता त्यावर व्यक्त करण्यात आलेल्या प्रतिक्रियांवरही आपण आपले थोबाड उसकटलेच आहे.... राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा, शिवसेना अशा तथाकथित "उजव्यां"नीच नाही तर सत्तधारी काँग्रेसनेही आपण आपली विधाने मागे घ्यावीत असे सांगत, अन्यथा कायद्याद्वारे आपल्याविरोधात कारवाई केली जाईल असे "सुचविले" आहे. त्यावर आपण काय मुद्दा उपस्थित केला आहे, व्वा !!!!!
आपण म्हणता की, "मी तर लक्षावधी काश्मिरींच्या भावनाच व्यक्त केल्या... अन या देशात न्यायाला - न्यायासाठी झगडणऱ्याला काही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही ?... उलट एका लेखकाच्या विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्राची अशी गळचेपी करणाऱ्या राष्ट्राची मला कीव येते... ज्या देशात लूटारू, बलात्कारी, जातीय दंगली माजविणारे, सांप्रदायिक अशी माणसे उजळ माथ्याने फिरतात, पण अन्यायाविरुद्ध आवाज उठविणाऱ्या एका लेखकाविरुद्ध अटकेची भाषा वापरली जाते, अशा देशाची मला कीव येते..."
लक्षावधी काश्मीरींच्या भावना व्यक्त करणाऱ्या तुमच्या सारख्या लेखिकेला लक्षावधी काश्मिरी पंडितांच्या भावना, त्या विस्थापितांचे दुःख, त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न याबद्दल काहीच वाटू नये ? भारताच्या ईशान्येकडील अरूणाचलसह इतर राज्ये चिनी अत्याचाराबद्दल, चीनच्या संभाव्य आक्रमणांबद्दल बोलतात, त्यांच्याबद्दल आपल्याला काही वाटू नये ? [ कदाचित आपल्या अखंड भारतामध्ये या गोष्टी येत नसाव्यात....] आजवर विविध दहशतवादी हल्ल्यात मुंबईतील अनेक स्त्रीया विधवा झाल्या, अनेकांचे पालकछत्र हरविले, अनेक कुटुंबे उघड्यावर आली त्यांच्याबद्दल आपल्याला काही वाटू नये ? इतकंच काय, पण इस्लामी देशामध्ये होणाऱ्या स्त्रीयांवरील अत्याचारांबद्दल आपण गुळणी धरून बसता ? शेजारच्या चीनमध्ये, सॉरी, कम्युनिस्ट चीनमध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार जिंकणाऱ्या "लेखकाला" तुरुंगात डांबले आहे - त्याच्या पत्नीला नजरकैदेत ठेवले आहे याबद्दल आपण काही प्रतिक्रिया व्यक्त करत नाही ? [की आपल्या विधानाद्वारे भारताची सर्वात मोठी लोकशाही ही प्रतिमा आपल्याला "तेजस्वी" करायची आहे ?] Is this your "algebra of infinite justice ?"
आपण बूकर पारितोषिकविजेत्या लेखिका आहात ! आपल्या मताला नाही म्हटलं तरी जगात काही किंमत आहे ! [ की कोण काळं कुत्र आपल्याला हिंग लावून विचारणार आहे, असा तुमचा समज आहे ? ] अशावेळी निदान भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचा {preamble} तरी विचार करा. त्यामध्ये स्वातंत्र्याचे घटक क्रमाने नमूद केले आहेत. तो क्रम असा : विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना.... अपेक्षा ही आहे की, आधी विचार करावा आणि मगच त्याची अभिव्यक्ती [expression] व्हावी..... पण किर्केगार्द नावाचा एक विचारवंत एक विधान करून गेला होता... तो म्हणाला की माणसे विचारस्वातंत्र्याचा उपयोग क्वचितच करतात पण त्याबदल्यात त्यांना उच्चारस्वातंत्र्य मात्र हवे असते.... आपण डॉ. बाबासाहेबाना खरे ठरवू इच्छिता की किर्केगार्दला ? आपण आपल्या लेखनातून God of Small Things लोकाना दाखविला होता..... मग आता आपण चीनचा पोपट असल्यासारख्या का बोलता आहात ?
ज्या भारतीय घटनेचा दाखला आपण लेखन स्वातंत्रासाठी देता, त्या भारतीय घटनेमध्येच अभिव्यक्ती स्वातंत्राबद्दल हे नमूद केले आहे की, देशाची अखंडता-एकात्मता आणि सार्वभौमत्व यांना बाधा येणार नाही अशा अभिव्यक्तीला स्वातंत्र्य आहे.... मग ही "स्मॉल थिंग" आपण कशी काय विसरता ?
फार बोललात बाई....! एक बुकर पारितोषिक मिळाले आहे... आता त्याच देशातील जनतेकडून "बुक्क"र पारितोषिक घेऊ नका.... !
आणि हो.... अखंड भारताच्या इतिहासात काश्मीरसह विद्यमान पाकिस्तानचाही समावेश होता - आहे आणि शाश्वत राहील ! त्यासाठी तुमच्या परवानगीची देशाला आणि "Millions of Kashmiree"ना गरज नाही...
जय हिंद !!!!
अखंड भारताचा {कारण मी आपला/ तुमचा असले शब्द येथे वापरू इच्छित नाही} मनस्वी नागरिक,
स्वरुप पंडित
p.s. :
* २६ ऑक्टोबर, १९४७ हा काश्मीर भारतात विलीन झाला तो दिवस !!!!
त्याच दिवशी अरुन्धती रॉय बरळल्या !
* १३ डिसेंबर, १९४६ ह्या दिवशी भारताच्या सार्वभौम संसदेमध्ये संविधान निर्मितीच्या उद्दिष्टांचा [preamble] ठराव मांडला गेला.
१३ डिसेंबर, २००१ या दिवशीच भारतीय संसदेवर हल्ला झाला.
* २६ नोव्हेंबर, १९४९ या दिवशी आपण भारताची राज्यघटना स्विकारली.
२६ नोव्हेंबर, २००८ या दिवशीच कसाब आदींनी भारतावर हल्लाबोल चढविला....
या तारखांमधील साधर्म्य हा केवळ योगयोग मानता येईल का ?
No comments:
Post a Comment