Tuesday, 30 November 2010

काही प्रश्न...... अस्वस्थ करणारे...

दैनंदिन आयुष्य जगताना मला काही प्रश्न पडत रहातात.. त्यांची उत्तरे "पकड़ण्या एव्हढी" माझी चिमुकली मूठ बळकट  नाही... पण त्यांचा योग्य वेळीच परामर्श न घेतल्यास ते किती भीषण रूप धारण करू शकतात , याचे चित्र माझ्या मनावर मी चितारु शकतो... तेच हे प्रश्न....!!! 
१] विविध पाश्चिमात्य देश आणि आपण यांच्यात काही ठळक साम्यस्थळे आहेत का ?
२] शिक्षण आणि शेती ही भारतातील किंवा कदाचित जगातील सर्वात “ग्लॅमरहीन” क्षेत्रे आहेत.. पण मानवी आयुष्याचा विचार करता ही खूप प्राथमिक स्वरुपाची.. पायाभरणी करणारी क्षेत्रे आहेत.. मग या fields चे पुनरुज्जीवन करण्यासाठी काय- काय करावे लागेल.. ?
३] महात्मा गांधी यांच्या भूमिका पहाताना मला एक गोष्ट जाणवली.. ती म्हणजे गांधीजींनी समूह / संघ / सहकार यांची भारतीय जनमानसावर सक्ती केली नाही.. उलट त्यांनी निवडीचे स्वातंत्र्य जनतेला बहाल केले.. खऱ्या अर्थाने त्यांची आंदोलने ही लोकशाहीची प्रतिमा म्हणावीत अशी ठरली.. कदाचित भारतीय मानसिकतेमध्ये संघभावनेला अथवा समूहाने एकत्र काम करण्याला अल्प स्थान आहे अस म्हणता येवू शकेल का ? विशेषतः वयक्तिक सत्याग्रहाच्या संदर्भात... आणि नंतरही भारतात कामगार चळवळींच्या एकूणच यशपयशसंदर्भात....
४] history repeats itself with minor changes , अस म्हणतात.. पण मग भारताच्या वर्तमानातील अनेक प्रश्नांवर आपण अन्य देशांकडे पहाण्यापेक्षा आपल्याच इतिहासात उत्तरे शोधू शकतो का ? कशी ? इतिहासाचा अभ्यास कसा करावा ?  आणि जर हे शक्य असेल तर आजवर तसे प्रयत्न झाले आहेत का ? कुठे ? झाले नसल्यास कोणत्या अडचणींमुळे हे होवू शकले नाही?
५] पाश्चिमात्यांचे अंधानुकरण आणि त्यांच्या संकल्पनांचा डोळस स्वीकार यातील फरक कसा ओळखावा ? आणि मग अंधानुकरण कसे थोपवावे ?
६] दूर्दैवाने एकूणच शिक्षण पद्धतीत योगी अरविंद यांच्या एकूणच कार्याचे वर्णन अभावानेच आढळते.. क्रांतीकारक ते अध्यात्म हा त्यांचा प्रवास.. किंवा या संकल्पनांमध्ये त्यांनी पाहिलेले अद्वैत....  त्याबद्दल काही सांगाल का ?
७] एका लेखात आणि एक व्याख्यानात मी असे वाचले की, डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे या भारतीय क्रांतीकारकाने , स्वतंत्र भारतात प्रवेश नाकारल्याने, मॅक्सिको येथे जावून तेथे महर्षी पराशर यांच्या कृषी विषयक ग्रंथांच्या मदतीने शेतीमध्ये क्रांती घडवून आणली. किंबहूना, आजही त्या देशात पराशर ॠषींच्या ग्रंथाचा शेतीविषयक अभ्यासक्रमामध्ये समावेश आहे... मग भारताच्या शेतीविषयक अभ्यासक्रमामध्ये असा समावेश का होत नसावा..?
८] कार्ल मार्क्स हे थोर विचारवंत होते.. उभे जग भांडवलवादाच्या “तावडीत” असेल तेव्हाच हे तत्वज्ञान सर्वाधिक लागू होते किंवा तशी शक्यता निर्माण होते... मग या न्यायाने तर मार्क्सवादाचा सर्वात जास्त प्रभाव अत्ताच्या जगावर पडणे अपेक्षित आहे..  जागतिक धोरणांवर समाजवादाचा प्रभाव असणे ही गरज आहे.. अशावेळी काळाने दिलेली ही सुवर्णसंधी ओळखण्यात भारतातील समाजवादी चळवळ यशस्वी होते आहे का..? नसल्यास का नाही ? की कुठेतरी ही या चळवळीच्या मनात आलेली “हतबलता” reflect करते आहे..?  I mean what according to you is the relevance of these ideologies in current context..?
९] काश्मीर आणि जेरुसलेम ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू मानता  येवू शकतील का ?
१०] हमीद दलवाई, नरहर कुरुंदकर यांसारख्या विचारवंतांनी केलेले इस्लामचे परिक्षण आणि सध्या जहाल हिंदुत्ववादी विचारवंतांनी केलेले समीक्षण यात साम्य आढळते.. तेव्हा खरोखरच इस्लाम मधील वहाबी पंथ हा जगासमोर धोका आहे हे सत्य मानणे भारतात का शक्य नाही ? किती वर्षे आपण सत्यापासून पळ काढणार ?
११] भारतातील हिंदू मुस्लिम प्रश्न आपल्याला reframe करता येणे शक्य आहे का ? म्हणजे हा प्रश्न हिंदू मुस्लिम संबंध नसून , मुस्लिमांबद्दल हिंदूंचा दृष्टीकोन कसा असावा  याबद्दल हिंदूंमध्येच असलेले मतभेद आहे , अस म्हणता येईल का ?  आणि त्यातून यावर उपाय शोधता येतील का ?
१२] आजही भारतात दुर्दैवाने राष्ट्रनिष्ठ म्हणवली जाणारी मंडळी समाजवाद / सर्वसमावेशकता यांपेक्षा संपूर्ण त्यागशीलतेकडे पहातात. तर समाजवादी म्हणविली जाणारी मंडळी राष्ट्रवाद / धर्म / संस्कृती असे शब्द अस्पृश्य मानतात. या द्वैत भावनेचा भारताच्या लोकशाहीच्या यशस्वीतेवर नकारात्मक परिणाम होत असेल का ? यावर काही उपाय ?

१३] ग्रामीण भारताच्या विकासाची आवश्यकता आहे असे आपण म्हणतो. प्रत्येक गावाचे असे एक वेगळेपण असते. त्या गावाची स्वतंत्र संस्कृती असते. अशा वेळी जगाने मानबिंदू ठरवलेली सुत्रे त्या गावावर विकास म्हणून लादण्यापेक्षा आपल्याला कुठेतरी "गावाच्या शक्तीस्थानांवर" त्या गावाला उभे करता येईल का ? म्हणजे मार्केटिंग, निसर्ग , दळण-वळण , माहिती तंत्रज्ञान या सगळ्या आघाड्यांवर proactively रचना करता येईल का? तसेच , ग्राम विकासाइतकीच "शहरी प्रतिगामित्वाची" गरज आहे असे म्हणता येईल का ?.....

मला हे प्रश्न का पडतात नाही माहीत, पण मला यांची उत्तरे शोधता येतील ?

Saturday, 27 November 2010

a true HUMAN character....

आयुष्यात येणारे अनुभव हे कित्येकदा उन्मळून टाकणारे असतात... वारंवार होणारे अन्याय, अधिकारपदावरील व्यक्तींकडून न्याय मिळण्याच्या मावळत्या शक्यता, सातत्याने होणारे पराभव, गाडाव्याशा वाटणाऱ्या इच्छा, अगदी जीवनावरूनच उडालेले मन या साऱ्यानंतरही आयुष्य सुरुच राहतं... अंधाराच्या साम्राज्यानंतर, प्रकाशाची कोणतीही आशा उरलेली नसताना ज्याप्रमाणे सूर्यबिंबाच्या ज्वाळा अंतरी उमटतात... तद्वतच मानवी अंतःकरणातही लढाऊ बाणा चेतवणाऱ्या ज्वाळा उमटत अस्तील का... ?
          
                                                       अंतरातील ज्वाळा.....

कोठून येती आव्हाने, कोठून येती अन्यायमाला
न उमजे, तरी अंतरी राहती उभ्या कोठून धगधगत्या ज्वाला... ?

शुक्लपक्षी आशा कलेकलेने वृद्धिंगत होई
कृष्णपक्षी निराशेचे सावट नभ झाकोळून जाई
ना चांदण्या, ना चंद्र नभी असा उद्दाम क्षणही आला
नुमजे तरी अंतरी उभ्या राहती कोठून धगधगत्या ज्वाला... ?


प्रणयाच्या धुंदीतून पहाटे बाहेर पडता रात्र
सावळ्या नभी उमटते गुलाबी लकेर अंशमात्र
जन्मास येई अनुदिनी तेजस्वी बालक कोवळा
नुमजे अंतरी उभ्या राहती कोठून धगधगत्या ज्वाला... ?


स्वप्न पडते निद्रेस जेव्हा मंगल पहाटेचे
निसर्ग नयनी ओघळती ठिपके दवबिंदूंचे
अंधाराच्या रस्त्यावर रवीरथ प्रकाश फेकीत आला..
नुमजे अंतरी उभ्या राहती कोठून धगधगत्या ज्वाला... ?


अन्यायाने पिचतो देह, पराभवाने कोमेजते तन
हतबल होते, निराश होते उत्साही-सृजनशील मन
तरिही पेटून उठतो देह.. अन्‌ चेतवितो बंडखोर वृत्तीला
नुमजे अंतरी उभ्या राहती कोठून धगधगत्या ज्वाला.... ?

Friday, 26 November 2010

the 26/11 ....

आज २६ नोव्हेंबर...
आज ताज जवळ हजारो "गर्व गीते" , गर्भगळित होणाऱ्यांकडून गायली जातील.. बॅनरबाजी होईल.. "शांततायात्रा" आयोजित केल्या जातील... भारतातील आणि मुंबईतील "मेणबत्ती" उद्योगाला तेजी येईल...  शासकीय नेते दहशतवादविरोधी भूमिका आक्रमकपणे मांडताना दिसतील... सरकार दहशतवाद्याना "ठेचून" काढण्यास कसे समर्थ आहे हे वारंवार सांगितले जाईल....

रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले, असे म्हणणाऱ्या चापेकर बंधूंना टिळकांनीच विचारले होते... "अरे तुम्ही असे म्हणता खरे, पण मग तो रॅंड अजून जिवंत कसा ?".. आज लोकमान्य टिळक हवे होते... त्यांनी आवर्जून विचारले असते... "अरे एव्हढ्या बाता मारता, तर तो कसाब अजून जिवंत कसा ?...."

या देशाला नेमके काय झाले आहे तेच कळत नाही... देशालाच कशाला, तुम्हा-आम्हाला किंबहूना मला काय झाले आहे तेच नाही कळत....

या देशात इतका मोठा नरसंहार अवघ्या दोन दिवसात होतो आणि या घटनेला दोन वर्षही उलटत नाहित तोच केंद्रिय दक्षता आयोगाच्या आयुक्तपदी नियुक्त झालेल्या अधिकाऱ्याची राज्य दक्षता आयोगापुढे चौकशी सुरु असल्याचे लक्षात घेऊन, सर्वोच्च न्यायालय या नियुक्तीवर आक्षेप नोंदविते.... आपण शांतच असतो...

या घटनेवेळी राज्याचे गृहमंत्री असणारे आमदार त्यानंतरच्या काळात झालेले गडचिरोलीमधील नक्षलवाद्यांचे हल्ले पचवूनही पुन्हा एकदा तेच पद ग्रहण करतात.. कसाबला कोठडीत जाऊन भेटतात... आणि त्याच देशात- त्याच राज्यात तुरूंगातून सुटलेल्या संजय दत्तशी हस्तांदोलन केल्याबद्दल एका हवालदाराला निलंबित करण्यात येते...
आपण शांतच असतो...

कशेळीसारख्या एक खेड्यात एका दुपारी अचानक एक बोट येते... तिच्या हालचाली संशयास्पद वाटतात.. समुद्रकिनाऱ्यावर उपस्थित तरूण सावधपणे पोलिसांना बोलावतात.. आणि कोणत्याही चौकशी शिवाय बोट सोडून दिली जाते... कसाब आणि मंडळी अशाच बोटीतून येवून काही दिवस पोलिसांसह मुंबईकराना वेठिस धरतात याचा पोलिसांना इतका सहज विसर पडतो..
आपण शांत असतो...

२६/११ रोजी कसाब आणि त्याच्या साथीदारांना बधवार पार्कमध्ये रात्री ८:४० वाजता स्थानिक मच्छिमार बांधवांकडून हटकले जाते... मात्र मुंबईतील पहिला गोळीबार रात्री ९:३७ वाजता होतो... म्हणजे जवळ-जवळ एक तास अतिरेकी मुंबईमध्ये मोकाट फिरत असतात.. तरीही अतिरेक्यांच्या स्थानिक "काँटॅक्ट्ची" शक्यता पोलिसांकडून ठामपणे फेटाळली जाते... आणि गंमत म्हणजे बधवार पार्क पासून सीएस्‌टी स्थानक वगळता अन्य सर्व हल्ल्याची ठिकाणे ही चालत १० मिनीटांच्या अंतरावर असतात.. आपल्याला हे सारे उघड्या डोळ्यांनी दिसत असते,पण ...
आपण शांतच असतो...

या हल्ल्यात शहीद झालेल्या अशोक कामटे यांच्या पत्नी विनिता कामटे ओरडून-ओरडून काही प्रश्न विचारतात.. पुस्तक रूपाने मांडतात.. कामटे यांना मुंबई पोलिसांची न मिळू शकलेली मदत, शहीद करकरे यांचे गायब झालेले "तथाकथित" बुलेटप्रूफ जॅकेट... ओंबाळे कुटुंबियांना न मिळालेली मदत... या साऱ्या गोष्टींनी आपण आतून हलून जातो.. पण...
आपण शांतच असतो...

२६/११ च्या घटनेचे ताशेरे आणि त्या अपयशाचे खापर सहजरित्या आपल्या गुप्तचर यंत्रणांवर फोडले जाते.. आपण मारे सतर्कतेच्या आणि दक्षतेच्या गप्पा मारायच्या.. आणि शेजारच्या माणसाशी साधे बोलायचे कष्ट आपण रेल्वेमध्ये प्रथम श्रेणीच्या डब्ब्यात घ्यायचे नाहीत... ही आपल्याच आजूबाजूला दिसणारी "सतर्कता" आपण टिपत असतो... पण..
आपण शांत असतो...

मला एक कविता आठवते....

".....then they came for me"
---------------------------------------
 first they came for the jews
 and i did nothing, because i am not a jew
 then they came for the communists
 and i did nothing because i am not communist
then they came for trade unionists
  and i said nothing because i am not a trade unionist
  and then they came for me
  and there was no one left to speak for me.....

आपली शांतता मला या दिशेने जाणारी वाटते...!
शहीदांना श्रद्धांजली म्हणून आरती गाण्यापेक्षा, मेणबत्त्या लावण्यापेक्षा, सरकारला दोष देण्यापेक्षा आपण काही वेगळे करूच शकत नाही का ? रस्त्यावरून जाताना न थुंकणे, कचरा रस्त्यावर न टाकणे, किमान आपल्या आसपास वावरणाऱ्या व्यक्तींचे निरिक्षण करणे, सैनिकांच्या जीवनाकडे केवळ "ईश्वरी" म्हणून न पाहता ती जीवनमुल्ये अंगी बाणवणे, किमान वाहतुकीचे नियम पाळणे आणि रस्त्यावर गोंधळाचे वातावरण निर्माण होणार नाही याची काळजी घेणे....... आपण इतक्या साध्या गोष्टीही करू शकत नाही का ? परिस्थिती बदलली पाहिजे म्हणून बोंबलण्यापेक्षा ती चिघळणार नाही याची साधी काळजी घेणे सोपे नाही का ? पण...
आपण शांतच असतो....

कोणे एके काळी, स्वातंत्र लढ्यात मोहनदास गांधीजी असे म्हणाले होते..
की, एकाच वेळी उभा भारत देश एकाच वेळी थुकला जरी, तरी हे गोरे त्यात वाहून जातील...
आपण इतर वेळी रस्त्यांवर पचापचा थुकतो... पण एकाच वेळी थुकायला जमेल.... ?
can we....????

Thursday, 4 November 2010

गाऊ त्यांना आरती....!!

 ----------------------------------------------------------
 दिवाळीचा फराळ , फटाके, नातेवाईकांच्या भेटी, सुंदर रोषणाई यात आपण न्हाऊन निघतो... सकाळचे अभ्यंग स्नान, सुगंधी उठणे यांची मजा अनुभवतो... आयुष्याच्या असंख्य वेदनांवर दिवाळीच्या रूपात फुंकर घातल्याचा आपल्याला भास होतो.... कारण आपण सुखी आणि सुरक्षित आयुष्य जगत असतो... ज्या काही मोजक्या पण समर्पित माणसांमुळे हे शक्य होत आले आहे, ती म्हणजे लष्कर आणि गुप्तचर संघटनांची माणसे... त्यांच्या योगदानाकडे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न.....
--------------------------------------------------


चित्रगुप्तासमोर एक माणूस उभा असतो...
त्याने आयुष्यात केलेल्या पाप-पुण्याचा हिशोब आणि लेखापरिक्षण सुरू असते...
त्याला काही प्रश्न विचारले जातात....
"तू आजवर अनेक माणसांवर हल्ले केलेस हे सत्य आहे?"
"हो..." समोरून शांतपणे उत्तर येते...
"तुझ्या आयुष्यात तू  स्वतःच्या पत्नी आणि मुलांकडे लक्ष दिलेले नाहीस, हे सत्य आहे ?"
"हो.." पुन्हा एकदा ठाम उत्तर.
"तू स्वतःच्या विवेक बुद्धीला पटत नसतानाही अनेक आदेश पाळले आहेस , बरोबर ?"
"हं..... बरोबर ! " आवाजाच्या लयीत जराही बदल न होता उत्तर येते..
"ऐन गरजेच्या वेळी तू तुझ्या जन्मदात्यांकडे लक्ष पुरवू शकला नाहीस हे सत्य ना ?"
"हो.. दुःखद आहे पण हे सत्य आहे..!" तितक्याच प्रांजळपणे उत्तर येते....

"मग आता तुला स्वर्गाचे दरवाजे बंद आहेत...! अशी पापे केल्याबद्दल तुला नरकात जावे लागेल.....!", चित्रगुप्त फर्मावितो.... आणि विचारतो, यावर तुझा काही प्रतिवाद ?
हा माणूस मंद हसतो.... आणि म्हणतो प्रतिवाद काहिही नाही... फक्त एक सांगायचे राहिले.... "मी भारतीय लष्करातील जवान आहे.!!"
चित्रगुप्ताचा ऑडिट रिपोर्ट तिथल्या तिथे बदलला जातो....
पण या एका "ब्लॅक ह्युमर" मधून भारतीय जवानांचे जीवन स्पष्ट होते........


                     शाश्वततेने अशाश्वततेचा आणि आव्हानांचा सातत्याने पाठपुरावा करणारे... भारतीयांच्या संरक्षणासाठी अविरत झटणारे... ऊन-वारा-पाऊस-बर्फ...{ आपल्यासाठी तीनच ऋतू असतात... पण सैन्यासाठी मात्र बर्फ हा स्वतंत्र प्रकार असतो... भारतात सियाचीन सारख्या ठिकाणी सैन्य -४० डिग्री ला कार्यरत असते...!!!} यांच्या निरपेक्ष डोळ्यात तेल घालून सीमांकडे लक्ष देणारे आणि कोट्यावधी भारतीयांच्या अपेक्षांचे ओझे सहजपणे आपल्या खांद्यावर वागविणारे आपले सैन्य.......

दिवाळीचा फराळ , फटाके, नातेवाईकांच्या भेटी, सुंदर रोषणाई यात आपण न्हाऊन निघतो... सकाळचे अभ्यंग स्नान, सुगंधी उटणे यांची मजा अनुभवतो... आयुष्याच्या असंख्य वेदनांवर दिवाळीच्या रूपात फुंकर घातल्याचा आपल्याला भास होतो.... कारण आपण सुखी आणि सुरक्षित आयुष्य जगत असतो... ज्या काही मोजक्या पण समर्पित माणसांमुळे हे शक्य होत आले आहे, ती म्हणजे लष्कर आणि गुप्तचर संघटनांची माणसे...
कशी असेल त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची दिवाळी..?

"खूपदा आम्ही घरीच नसतो... किंवा असलो तरी डोळ्यासमोर सातत्याने सीमांवरील परिस्थिती असते !", कॅप्टन पाटणकर सांगत होते. "फराळ, फटाके यांचे विशेष काही वाटत नाही... आणि असेही एका कारगील सारख्या युद्धात आम्ही उभ्या आयुष्याचे फटाके पाहून घेतलेले असतात...पण.... " बोलता बोलता त्यांच्या नजरेत उरातील शल्य व्यक्त करणारा ओलावा येतो... "खऱ्या अर्थाने आम्ही भाऊबीजेसारखा सण मात्र मिस करतो...!" उभ्या देशाशी रक्षाबंधन खेळणारी ही माणसे स्वतःच्या हक्काच्या बहिणीला मात्र वेळ देवू शकत नाहीत... आणि दुसरीकडे आपण मात्र ताईने किंवा दादाने मला हवी ती भेटवस्तू दिली नाही म्हणून चिड-चिड करत असतो....

"आम्हाला काय, आमची मुले घरी येतील तोच दिवाळी आणि दसरा..." अशाच एका अनाम वीराची आई हळवी होवून सांगत असते.. प्रत्येक दिवाळीला फराळ केला तरी तो घशाखाली उतरत नाही... आठवण येत रहाते... कधी लाडक्या लेकाऐवजी त्याची मित्रमंडळी घरी येतात.... मग मात्र बरे वाटते... ते मित्रही आम्हाला आई आणि बाबा म्हणूनच हाक मारतात.... मोट्ठी पोकळी भरून निघाल्यासारखी वाटते.. आई बोलतच रहातात.. नकळ आपणही त्यांना आई-बाबा म्हणू लागलेलो असतो...
 
  नुकताच लष्करात लेफ्टनंट म्हणून जॉईन झालेल्या विक्रांत बापट यांच्या आई सांगत होत्या... यावेळी तर विक्रांत पुण्याला आहे... पण एव्हढ्या जवळ असूनही आमची भेट मात्र होईलच असे नाही... उलट यंदा विक्रांतच्या मित्रांनीच फर्माईश केली आहे.. करंज्या, लाडू अशा पदार्थांची... त्यांमुळे ते पाठवणार आहे... तेव्हढाच आनंद आणि समाधान ! आई भरभरून बोलत असतात.... आपण मंत्रमुग्ध झालेलो असतो... स्वतःच्या आयुष्यातील सुखांचे अर्थ आणि सखोलता शोधत..!

   एकीकडे , कुटुंबांची अशी भावना तर , दुसरीकडे अरूणाचल मधील केंगसुंग दामो ह्या एडीसीची कहाणी... "ऐन भारत-चीन युद्धाच्या धामधूमीतला जन्म.. तोही तावांग मधील... तेव्हाही दिवाळीच होती... पण त्यावेळी वेगळ्या फटाक्यांचा संस्कार झाला... आणि कायमचाच ! त्यातूनच आयुष्यात भेटणाऱ्या प्रत्येकाला संवाद साधण्याच्या आधी ’जय हिंद’ म्हणायची सवय लागली अन्‌ त्याच सहजतेने सरकारच्या अरूणाचलकडे होणाऱ्या दूर्लक्षाकडे पहाण्याचीही आदत बन गयी..!" दामो सांगत असतात... आज पन्नास वर्ष व्हायला आली तरी इशान्येकडे होणाऱ्या भारताच्या दूर्लक्षाची अखंड परंपरा आणि चीन संदर्भातील  धोरणांचे अंधत्व कायम आहे...

    एकिकडे समोर उभ्या असलेल्या पराक्रमाच्या आणि इच्छाशक्तीच्या जिवंत मूर्तीकडून आपल्याला इतिहासाचे ज्ञान होत असते.. आणि दुसरीकडे आपण इतिहासाची वर्तमानाशी सांगड घालत असतो... परिणाम ? समोरची मूर्ती कायमच हसरी आणि आपल्या नशिबी मात्र हतबलता !

काही "नशीबवान" घरात मात्र आपल्याला उत्साहाचे वातावरण दिसून येते.. तेथील नजराच सांगतात.. की ही आमची सर्वार्थाने दिवाळी आहे... आपणही नकळत आपली दिवाळी साजरी करू लागतो... त्या घरात एकाच वेळी, येणाऱ्या पाहुण्यांची सरबराई केली जात असते.. कुटुंबाच्या सदस्यांना एकमेकांशी संवाद साधायचा असतो... अल्प उपलब्ध वेळात घरी आलेल्या "लाडक्यांचा" सहवास मुक्तपणे लुटायचा असतो.. आणि तरीही एक प्रकारची विलक्षण संयतता घरात आढळते.....

भगवद्गीतेचा दूसरा अध्याय आपण अनुभवत असतो....
भारताच्या सैन्याचा अजोड त्याग, त्यांचा पराक्रम, त्यामागे त्यांच्या कुटुंबीयांचे असलेले योगदान आपल्याला अस्वस्थ करून सोडते..
शत्रू नाशाची नरक चतुर्दशी, संरक्षणाचे लक्ष्मीपूजन आणि पराक्रमाचा पाडवा आपल्याला एका गीताच्या ओळी आठवून देतो...

"संगरी विराग्रणी जे धैर्यमेरू संकटी
जन्मले या भारती...
गाऊ त्यांना आरती... गाऊ त्यांना आरती...!!!"