प्रिय राहूल यांस,
स.न.वि.वि...
आज तू निवृत्त झालास... तुझ्या यापुढील आयुष्याला-वाटचालीला मनःपूर्वक शुभेच्छा !
पण खरं सांगू, ही बातमी वाचताना तू नाही तर "कलात्मक फलंदाजी" निवृत्त झाल्यासारखे वाटले. तुझ्या या निर्णयाने कदाचित नवोदितांना संधी मिळेलही पण ते फार तर तुझा फलंदाजीचा क्रमांक घेवू शकतील तुझी "जागा" नाही...
अभेद्य बचाव भेदून तुझ्या यष्टीचा [ स्टंपचा ] वारंवार घेतला गेलेला वेध आणि कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या हातांनी ऐनवेळी दाखवलेला "हात" यांचे "ओझे" तुझ्या सात्विक-संवेदनशील मनाला पेलवले नाही... आणि तुझी देदिप्यमान कारकीर्द तू थांबवलीस.... यानिमित्ताने एकाच आठवड्यात आम्हाला कारकीर्द "थांबविणारा" आणि वारसा हक्काने लाभलेली कारकीर्द "लांबविणारा" असे दोन्ही राहूल पहायला मिळाले... आणि मला वाटतं की, हेच तुझ्या निवृत्तीचे सर्वोत्तम रूपक आहे... आज भारतीय क्रिकेटमधून राहुल नाही तर "कुठे थांबायचे" याचे भान जणू निवृत्त होत आहे...
वृत्तपत्रांत बातम्या आहेत राहूल.. की तू म्हणे सर्वाधिक ८८ शतकी भागिदाऱ्यांतील सहकारी होतास... त्यातील २० थेट सचिन तेंडुलकरसह ! अरे आम्हा भारतीयांना ना, मूळात नेत्रदीपक फटाक्यांचंच महत्त्व वाटतं रे.. दिवाळीच्या आतिषबाजीत "सेव्हन शॉट्स, रॉकेट्स" यांसारख्या नेत्रदीपक फटाक्यांबरोबरच ते पेटविणाऱ्या उदबत्तीचंही महत्त्व असतं, हे मूळी आमच्या गावीच नसतं...या शतकी भागीदाऱ्यांमध्येच नव्हे तर तुझ्या स्वतःच्या शतकांच्या वेळीही अनेकदा समोरच्या फटाक्यांमुळे तू ही मंद जळणारी पण सुगंध पसरविणारी उदबत्तीची भूमिका आनंदाने स्वीकारलीस.. इतरांचे लक्ष वेधून स्वतःचे "मार्केटिंग" करण्याच्या या युगात तू संघहितासाठी स्वतःच्या कित्येक शिल्पवत खेळींना इतरांच्या खेळीत विरघळू दिलंस... राहुल तुझी निवृत्तीची घोषणा ही जणू भारतीय क्रिकेटमधून या ऋषितुल्य वृत्तीची निवृत्ती वाटू लागली आहे...
राहुल, कारकीर्दीच्या ऐन बहरात तुझी सचिनशी तुलना होत राहिली.. सचिनचे व्यक्तिमत्व, फलंदाजी आणि माणूस म्हणून असलेले मोठेपण हे याचे कारण असेलही... पण राहुल गृहलक्ष्मी आणि प्रेयसी यांच्यात फरक असतोच... [ ही उपमा माझी नाही.. द्वारकानाथ संझगिरी यांची आहे ! पण स्टीव्ह वॉच्या बाबतीत वापरलेली...] सचिनची फलंदाजी ही प्रेयसी आहे.. तिला लहरी स्वभाव आहे.. स्वतःच्या सौंदर्याचे भान आहे.. आकर्षकता आहे.. त्यामुळे तिच्या लटक्या रागाचे - नाराजीचे आणि तक्रारींचेही कौतुकच होणार रे ! पण तुझी फलंदाजी गृहलक्ष्मीसारखी आहे... भारतीय फलंदाजीचा संसार कर्जबाजारी झाला - संकटात सापडला की आम्हाला गृहलक्ष्मी आठवू लागायची... तुझ्या लटक्याच काय पण खऱ्याखुऱ्या "विनंतीवजा" तक्रारींकडे आम्ही चुकूनही लक्ष द्यायचो नाही.. तुझ्या फलंदाजीतील आजारपण [ हरवलेला फॉर्म ] हे आम्हाला कधीही आपलं वाटलं नाही.. तुला तुझ्या खेळण्याच्या शैलीत बदल करण्यासाठी दिलेल्या संधी " गरजेपेक्षा जास्त " होताहेत असेही प्रसंगी आम्ही बोललो.. पण, धावफलक आजारी पडला - पेशंटच्या नातेवाईकांना बोलावण्याची वेळ आली की आम्हाला आमच्या गृहलक्ष्मीच्या व्रतस्थतेची - सात्विकतेची - पावित्र्याची - पुण्याईची खात्री वाटायची..
राहूल आज तू निवृत्त होत नाहियेस... तर भारतीय फलंदाजीतील गृहलक्ष्मीची व्रतस्थता - पावित्र्य आणि मांगल्य निवृत्त होतंय..!
कोणत्याही विषयावर बोलणं [ खरं म्हणजे पचकणं... ] हा आम्हा भारतीयांचा सहज स्वभाव... पण तू याला अपवाद होतास..
सचिन १९४ वर असताना डाव घोषित करण्याचा निर्णय तुझ्या कारकीर्दीत अंगावर देवीच्या लसीची खूण दिसावी तसा अमीट राहील पण त्यावरही तुझे "भाष्य" नाही... असंबद्ध विषयांवरही कालसुसंगत अशा "एक्स्पर्ट्स कॉमेंट्स" नाहीत... ग्रेग चॅपेलसारख्या वादळी-वादग्रस्त आणि भारतीय मनाला न पचणाऱ्या प्रशिक्षकाच्या काळात तू कर्णधारपद सांभाळलेस.. अक्षरशः "सांभाळलेस"...
आणि "सांभाळलेस" या शब्दाला इतका न्याय अगदी क्वचितच कोणीतरी दिला असेल.. पण त्या कालखंडातही कोणत्याही पराभवानंतर अथवा विजयानंतर भारतीय संघात दुफळी माजल्याच्या बातम्या आल्या नाहीत... चॅपेलच्या ग्रहणाने तुला ग्रासले नाही.. अरे, बांधिलकी - सुसंस्कृतपणा आणि सभ्यता म्हणजे दुसरे काय असतं रे ? म्हणून मला तुझी निवृत्ती ही तुझी निवृत्ती नाही वाटत... तर.....
राहूल मला नेहमीच एका गोष्टीची गंमत वाटत आली आहे.. १६० किमी प्रती तास या वेगाने शोएब तुला जिवाच्या आकांताने बाऊंसर टाकतोय आणि तू शांत चर्येने तो "वेल लेफ्ट" करतो आहेस.. सचिनने विश्वचषकात शोएबला हाणलेल्या षट्कारापेक्षा शोएबला हा अवमान जास्त डाचत असेल.. राहूल आज तुझ्या एका घोषणेने शांत चर्येने, कोणत्याही प्रतिक्रीयेशिवाय पण सावध चित्ताने प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्याची क्षमता मैदान सोडत आहे...
सचिनच्या निष्कलंक मानवी प्रतिमेचं सदैव कौतुक होत आलंय... तुझीही प्रतिमा तितकीच निष्कलंक आहे रे.. इतकंच नव्हे तर फेरारी, वाढीव एफ.एस.आय. यांसारखे वाद तुझ्या आसपासही फिरकू शकले नाहीत.. पण या गोष्टीचं म्हणावं असं कौतुक नाही झालं राहुल.. किंवा कदाचित स्वतःच्या वृत्तीचं "मार्केटिंग" करणं तुला पचनी पडलं नसेल.. पण आज तू निवृत्त होताना स्वतःच्या वृत्तीचं-प्रतिमेचं मार्केटिंग करायचं नसतं हे मूल्य भारतीय फलंदाजीचे मैदान सोडणार आहे.. जाहिराती करताना सचिन-धोनी आणि कंपनीचे मिळकतीचे आकडे - ब्रॅंड सदैव चर्चेत राहिले.. पण आम्हाला राहुल द्रविड दिसला तो,बाबा आमटेंच्या आनंदवनासाठी - हेमलकसाच्या लोकबिरादरी प्रकल्पासाठी मदतीचे आवाहन करताना... आणि ते सुद्धा मराठीत करताना..!
सामाजिक सामिलकीचं हे निर्मोही वृत्तीचं लेणं आज तुझ्या निर्णयाने निवृत्त होतंय !
लिहावं तितकं थोडंच आहे..
राहुल कुसुमाग्रजांच्या "कणा" या कवितेतील लढवय्यी मानसिकता ही तुझी खासीयत.. तू यापुढेही जे कोणते क्षेत्र निवडशील त्यात तुला "विजेता" करेलंच ! [ तसा तू डॉ. विजेता राहुल द्रविड आहेस याचेही भान आहे मला.. ! ] पण तुझी ही वृत्ती-मानसिकता आणि संस्कार आम्हाला मिळोत याच अपेक्षांसह ,
तुझा स्नेहाभिलाषी,
स्वरूप पंडित.
तू लिहिलेलं हे पत्र मस्तं आहे !!!! शब्दच नाहीत माझ्या जवळ! खरंच खुद्द राहुल द्रविडलासुद्धा खूप आनंद होईल !!!
ReplyDelete