कर्तव्याने घडतो माणूस - मनोहर कवीश्वर
ऐनयुद्धाच्या वेळी रणांगणावर मोहवश झालेल्या अर्जुनाला युद्धासाठी तयार हो हे समजावताना श्रीकृष्णाने केलेला उपदेश आणि गीतेतील अंश काव्यरूपात मांडला आहे.विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था
कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरूषार्था ॥धृ॥
शस्त्र त्याग तव शत्रू पुढती नच शोभे तुजला
कातर होसी समरी मग तू वीरोत्तम कसला
घे शस्त्र ते सुधीर होऊन रक्षाया धर्मार्था
कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरूषार्था ॥१॥
कर्तव्याच्या पुण्यपथावर मोहांच्या फूलबागा
मोही फसता मुकशिल वीरा मुक्तीच्या मार्गा
इह तव लोकी अशांतीने तव विक्रम झुकवील माथा
कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरूषार्था ॥२॥
कुणी आप्त ना कुणी सखा ना जगती जीवांचा
क्षणभंगुर ही संसृती आहे खेळ ईश्वराचा
भाग्य चालते कर्मपदांनी जाण खऱ्या वेदार्था
कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरूषार्था ॥३॥
रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो
कौरवात मी पांडवांत मी अणुरेणूत भरलो
मीच घडवितो मीच मोडितो उमज आता परमार्था
कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरूषार्था ॥४॥
कर्मफुलाते अर्पून मजला सोड अहंता वृथा
सर्व धर्म परी त्यजून येई शरण मला भारता
कर्तव्याची साद तुझ्या तुज सिद्ध करी धर्मार्था
कर्तव्याने घडतो माणूस जाणुन पुरूषार्था ॥५॥
No comments:
Post a Comment