Friday, 30 March 2012

लष्करप्रमुखांची भूमिका : एक मुक्तचिंतन !



भारतीय लष्करप्रमुख जनरल व्ही.के. सिंग यांनी गेल्या तीन दिवसांत सर्वच भारतीय युवकांचे लक्ष वेधून घेतले आहे. एकाच वेळी राष्ट्रीय अखंडत्वाशी एकनिष्ठा, भ्रष्टाचाराविरुद्ध रणशिंग फुंकण्याची वृत्ती आणि संरक्षण दलांसारख्या पोलादी भिंत असलेल्या विश्वात पारदर्शकता आणायचा प्रयत्न अशा विविध आघाड्यांवर श्री. सिंग यांनी डाव टाकला आहे. [ आणि दुर्दैवी गंमत म्हणजे याच तीन आघाड्यांवर एका "आघाडी"तील दुसरे एक सिंग चीतपट होत चालले आहेत...! ]

लष्करप्रमुखांच्या आक्षेपांनंतर भारतभरातील प्रसारमाध्यमांमध्ये अनेक मुद्दे उपस्थित केले जात आहेत..

जनरल सिंग यांनी इतके दिवस लेखी स्वरुपातील तक्रार का केली नाही, ते आजवर गप्प का बसले, त्यांनी स्वतःच्या वयाचा मुद्दा ज्या जिद्दीने सर्वोच्च न्यायालयात लढवला त्याच जिद्दीने त्यांनी ही "कथित" भ्रष्टाचाराची बाब लाचलुचपत विभागाकडे का नेली नाही, त्यांनी स्वतः लष्करी अधिकारात संबंधित व्यक्तीवर कोणतीही कारवाई का केली नाही, एका लष्करप्रमुखाच्या या विधानांचा सैन्याच्या मनोबलावर नेमका काय परीणाम होईल, BRICS समिटच्या संध्येला असे विधान करणे बेजबाबदारपणाचे नाही का, संरक्षणदलाशी संबंधित बाब असूनही लष्करप्रमुखांचे पत्र प्रसारमाध्यमांकडे कसे पोहोचले... हे आणि असे श्री. व्ही. के. सिंग यांच्याच निष्ठेबद्दल-हेतूबद्दल असंख्य प्रश्न प्रसारमाध्यमांमधून प्रामुख्याने चर्चिले गेले.

एक पत्रकार आणि विद्यार्थी म्हणूनही मला जाणवलेले हे काही प्रश्न मी आता नोंदवित आहे...


Ø  "कॅश फॉर व्होट" प्रकरणानंतर भ्रष्टाचाराविरुद्ध रणशिंग फुंकणाऱ्यांना संरक्षण मिळणे गरजेचे आहे अशी सामान्य माणसाची भावना होवू लागली. त्यात "माहितीच्या अधिकाराचा" वापर करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हत्यांनी भर पडली. सध्या भारतीय संसदेत "Protection for Whistle-Blower Bill" चर्चेसाठी पडून आहे.. लष्करप्रमुखांची सध्याची कृती ही संबंधित विधेयक किती तातडीने पारीत करणे गरजेचे आहे, हीच बाब अधोरेखित करणारी आहे.. भारत सरकार संबंधित विधेयक पास करण्यासाठी कोणती पावले उचलणार आहे ? [ सरकारच्या या संदर्भातील उत्तरात अनेक बाबी दडलेल्या आहेत.. जसे लष्करप्रमुखांनी आपली सेवानिवृत्ती जवळ आली असतानाच भ्रष्टाचाराविरुद्ध रणशिंग का फुंकले असावे.. ]

Ø जनरल सिंग यांनी केलेल्या आरोपांच्या "टीआरपी" मध्ये एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न अनुत्तरीत राहिला आहे. तो म्हणजे ज्या "तात्रा" या रशियन कंपनी बद्दल लाचखोरीचे आरोप केले गेले आहेत त्या कंपनीकडून भारत सरकारने आजवर किती कोटींची उपकरणे आणि युद्धसामग्री घेतली आहे ? संबंधित साधनसामग्रीची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत आणि भारताने दिलेली किंमत यांत किती तफावत आहे ? जी उपकरणे भारताने घेतली आहेत ती आंतरराष्ट्रीय मानांकने आणि दर्जा यांचा विचार करता कोणत्या प्रतीची आहेत ? आणि संबंधित सर्व आर्थिक तसेच धोरणात्मक व्यवहार कोणत्या पंतप्रधानांच्या कार्यकाळात झाले आहेत ?

Ø समजा लषकरप्रमुखांनी केलेली संरक्षणसिद्धते संदर्भातील विधाने खोटी आहेत असे मानायचे झाले तर याचा अर्थ भारताचा लष्करप्रमुख सैन्याचे मनोबल जाणीवपूर्वक खच्ची करीत आहे असा होतो. म्हणजे लष्करप्रमुखांच्या बांधिलकी - निष्ठा आणि त्यांचे चारित्र्य यांबद्दल प्रश्नचिन्ह उभे रहाते. जर हे सत्य मानायचे असे म्हटले तर अशा व्यक्तीची नेमणूक संरक्षण मंत्रालयाने कशी काय केली तसेच गुप्तचर खात्याकडून त्यांच्याबद्दल पुरेशी माहिती मिळाली नव्हती का / किंवा श्री. सिंग यांची पार्श्वभूमी नीट तपासली गेली नव्हती का आणि माहिती मिळाली असल्यास मंत्रालयाने त्या माहितीचे काय केले असेही उपप्रश्न उपस्थित होतात.

Ø भारताच्या पूर्व - ईशान्य सीमेवरील प्रदीर्घ सेवा, आदर्श घोटाळा प्रकरणी घेतलेली कठोर भूमिका, सुकना जमीन प्रकरणात लेफ्टनंट जनरल पदावरील दोषी व्यक्तींवर कारवाई करण्यात दाखवलेली तत्परता, माओवाद्यांसंदर्भात तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम यांना सल्ला देताना दाखवलेला परखडपणा या साऱ्या बाबी लक्षात घेता चीनी सीमारेषेवरील हालचाली, संरक्षण सिद्धता, लष्कराच्या गरजा आणि त्यांची पूर्तता करण्यात येणारे अडथळे यांची माहिती लष्करप्रमुखांना असेल की संरक्षणमंत्र्यांना ? आणि जनतेच्या मनात विश्वासार्हता कोणाबद्दल असावी : सैन्यप्रमुख की संरक्षणमंत्री ?

Ø भारतीय लष्कराच्या मानसिकतेवर दुय्यम दर्जाच्या उपकरणांच्या खरेदीतील गैरकारभाराचे वृत्त ऐकून विपरीत परीणाम होईल की ज्या नोकरशाहीच्या लाल-फितीच्या कारभारातून, निष्क्रीयतेतून, मंत्रालयांच्या जोखडातून लष्करी निर्णयांच्या तडफदारीला जावे लागते त्याचा सैन्याच्या मनोबलावर अधिक विपरीत परीणाम होईल ?

Ø भारतीय पोलिस दले, निमलष्करी दले, गुप्तचर यंत्रणा, संरक्षण दले यांच्याबाबत भारतीयांच्या मनात विलक्षण आदर आणि कुतुहल आहे. या दलांच्या बांधिलकीबद्दल जनतेच्या मनात विश्वास आहे. मात्र त्याच वेळी गोपनीयतेच्या नावाखाली या दलांसंदर्भात सरकारी पातळीला पोलादी भिंत किंवा गूढ वलय निर्माण केले जाते.. जे अनावश्यक असते..
देशाच्या संरक्षण सिद्धतेची जबाबदारी लष्करावर असते. मग ही जबाबदरी पार पाडण्यात कोणत्या अडचणी येत आहेत याची माहिती जर एखाद्या लष्करप्रमुखाने भारतीय नागरीकांना लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाद्वारे [ प्रसारमाध्यमांद्वारे ] दिली, तर त्यास वावगे म्हणता येईल काय ?

जाताजाता....

स्वतंत्र भारतातील पहिला भ्रष्टाचार हा संरक्षण मंत्र्यांनीच केला होता.. श्री. कृष्णमेनन हे ते मंत्री होते... आणि तत्कालीन पंतप्रधान पं जवाहरलाल नेहरू यांच्या अत्यंत विश्वासातील तसेच निकटवर्तीयांपैकी ते एक होते.
दुःखद म्हणजे श्रीम. इंदिरा गांधी यांच्या कारकीर्दीत रशियाच्या केजीबी या गुप्तचर यंत्रणेने केलेल्या नोंदींनुसार भारतीय लष्करी उपकरणांची कंत्राटे मिळवण्यासाठी रशियन कंपन्या बाजारपेठेच्या किंमतीपेक्षा किमान दसपट जास्त बिले आकारत असत आणि ही बाब सदर कंपन्या भारतीय राजकारण्यांच्या विनंतीवरून करीत असत.  [ संदर्भ :India's external intelligence : Secrets of RAW हे मेजर जनरल व्ही. के. सिंग लिखित मानस प्रकाशनाचे पुस्तक ]
तसेच उपलब्ध माहितीनुसार  भारताने १९८६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री श्री. राजीव गांधी यांच्या कारकीर्दीत सर्वप्रथम तात्रा ट्रक घेतले होते... बोफोर्स घोटाळा सुद्धा याच पंतप्रधानांच्या कारकीर्दीत घडला होता..
आणि...
सध्याचे संरक्षण मंत्री हे श्रीम. सोनिया गांधी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी तसेच राजकीय सल्लागार त्रयीपैकी एक आहेत..
हा निव्वळ योगायोग मानावा..

Saturday, 10 March 2012

प्रिय राहूल द्रविड यांस !!!!!!!!!






प्रिय राहूल यांस,
             स.न.वि.वि...

आज तू निवृत्त झालास... तुझ्या यापुढील आयुष्याला-वाटचालीला मनःपूर्वक शुभेच्छा !
पण खरं सांगू, ही बातमी वाचताना तू नाही तर "कलात्मक फलंदाजी" निवृत्त झाल्यासारखे वाटले. तुझ्या या निर्णयाने कदाचित नवोदितांना संधी मिळेलही पण ते फार तर तुझा फलंदाजीचा क्रमांक घेवू शकतील तुझी "जागा" नाही...

अभेद्य बचाव भेदून तुझ्या यष्टीचा [ स्टंपचा ] वारंवार घेतला गेलेला वेध आणि कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या हातांनी ऐनवेळी दाखवलेला "हात" यांचे "ओझे" तुझ्या सात्विक-संवेदनशील मनाला पेलवले नाही... आणि तुझी देदिप्यमान कारकीर्द तू थांबवलीस.... यानिमित्ताने एकाच आठवड्यात आम्हाला कारकीर्द "थांबविणारा" आणि वारसा हक्काने लाभलेली कारकीर्द "लांबविणारा" असे दोन्ही राहूल पहायला मिळाले... आणि मला वाटतं की, हेच तुझ्या निवृत्तीचे सर्वोत्तम रूपक आहे... आज भारतीय क्रिकेटमधून राहुल नाही तर "कुठे थांबायचे" याचे भान जणू निवृत्त होत आहे...



वृत्तपत्रांत बातम्या आहेत राहूल.. की तू म्हणे सर्वाधिक ८८ शतकी भागिदाऱ्यांतील सहकारी होतास... त्यातील २० थेट सचिन तेंडुलकरसह ! अरे आम्हा भारतीयांना ना, मूळात नेत्रदीपक फटाक्यांचंच महत्त्व वाटतं रे.. दिवाळीच्या आतिषबाजीत "सेव्हन शॉट्स, रॉकेट्स" यांसारख्या नेत्रदीपक फटाक्यांबरोबरच ते पेटविणाऱ्या उदबत्तीचंही महत्त्व असतं, हे मूळी आमच्या गावीच नसतं...या शतकी भागीदाऱ्यांमध्येच नव्हे तर तुझ्या स्वतःच्या शतकांच्या वेळीही अनेकदा समोरच्या फटाक्यांमुळे तू ही मंद जळणारी पण सुगंध पसरविणारी उदबत्तीची भूमिका आनंदाने स्वीकारलीस.. इतरांचे लक्ष वेधून स्वतःचे "मार्केटिंग" करण्याच्या या युगात तू संघहितासाठी स्वतःच्या कित्येक शिल्पवत खेळींना इतरांच्या खेळीत विरघळू दिलंस... राहुल तुझी निवृत्तीची घोषणा ही जणू भारतीय क्रिकेटमधून या ऋषितुल्य वृत्तीची निवृत्ती वाटू लागली आहे...

राहुल, कारकीर्दीच्या ऐन बहरात तुझी सचिनशी तुलना होत राहिली.. सचिनचे व्यक्तिमत्व, फलंदाजी आणि माणूस म्हणून असलेले मोठेपण हे याचे कारण असेलही... पण राहुल गृहलक्ष्मी आणि प्रेयसी यांच्यात फरक असतोच... [ ही उपमा माझी नाही.. द्वारकानाथ संझगिरी यांची आहे ! पण स्टीव्ह वॉच्या बाबतीत वापरलेली...] सचिनची फलंदाजी ही प्रेयसी आहे.. तिला लहरी स्वभाव आहे.. स्वतःच्या सौंदर्याचे भान आहे.. आकर्षकता आहे.. त्यामुळे तिच्या लटक्या रागाचे - नाराजीचे आणि तक्रारींचेही कौतुकच होणार रे ! पण तुझी फलंदाजी गृहलक्ष्मीसारखी आहे... भारतीय फलंदाजीचा संसार कर्जबाजारी झाला - संकटात सापडला की आम्हाला गृहलक्ष्मी आठवू लागायची... तुझ्या लटक्याच काय पण खऱ्याखुऱ्या "विनंतीवजा" तक्रारींकडे आम्ही चुकूनही लक्ष द्यायचो नाही.. तुझ्या फलंदाजीतील आजारपण [ हरवलेला फॉर्म ] हे आम्हाला कधीही आपलं वाटलं नाही.. तुला तुझ्या खेळण्याच्या शैलीत बदल करण्यासाठी दिलेल्या संधी " गरजेपेक्षा जास्त " होताहेत असेही प्रसंगी आम्ही बोललो.. पण, धावफलक आजारी पडला - पेशंटच्या नातेवाईकांना बोलावण्याची वेळ आली की आम्हाला आमच्या गृहलक्ष्मीच्या व्रतस्थतेची - सात्विकतेची - पावित्र्याची - पुण्याईची खात्री वाटायची..
राहूल आज तू निवृत्त होत नाहियेस... तर भारतीय फलंदाजीतील गृहलक्ष्मीची व्रतस्थता - पावित्र्य आणि मांगल्य निवृत्त होतंय..!

कोणत्याही विषयावर बोलणं [ खरं म्हणजे पचकणं... ] हा आम्हा भारतीयांचा सहज स्वभाव... पण तू याला अपवाद होतास..
सचिन १९४ वर असताना डाव घोषित करण्याचा निर्णय तुझ्या कारकीर्दीत अंगावर देवीच्या लसीची खूण दिसावी तसा अमीट राहील पण त्यावरही तुझे "भाष्य" नाही... असंबद्ध विषयांवरही कालसुसंगत अशा "एक्स्पर्ट्स कॉमेंट्स" नाहीत... ग्रेग चॅपेलसारख्या वादळी-वादग्रस्त आणि भारतीय मनाला न पचणाऱ्या प्रशिक्षकाच्या काळात तू कर्णधारपद सांभाळलेस.. अक्षरशः "सांभाळलेस"...
आणि "सांभाळलेस" या शब्दाला इतका न्याय अगदी क्वचितच कोणीतरी दिला असेल.. पण त्या कालखंडातही कोणत्याही पराभवानंतर अथवा विजयानंतर भारतीय संघात दुफळी माजल्याच्या बातम्या आल्या नाहीत... चॅपेलच्या ग्रहणाने तुला ग्रासले नाही.. अरे, बांधिलकी - सुसंस्कृतपणा आणि सभ्यता म्हणजे दुसरे काय असतं रे ? म्हणून मला तुझी निवृत्ती ही तुझी निवृत्ती नाही वाटत... तर.....

राहूल मला नेहमीच एका गोष्टीची गंमत वाटत आली आहे.. १६० किमी प्रती तास या वेगाने शोएब तुला जिवाच्या आकांताने बाऊंसर टाकतोय आणि तू शांत चर्येने तो "वेल लेफ्ट" करतो आहेस.. सचिनने विश्वचषकात शोएबला हाणलेल्या षट्कारापेक्षा शोएबला हा अवमान जास्त डाचत असेल.. राहूल आज तुझ्या एका घोषणेने शांत चर्येने, कोणत्याही प्रतिक्रीयेशिवाय पण सावध चित्ताने प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्याची क्षमता मैदान सोडत आहे...



सचिनच्या निष्कलंक मानवी प्रतिमेचं सदैव कौतुक होत आलंय... तुझीही प्रतिमा तितकीच निष्कलंक आहे रे.. इतकंच नव्हे तर फेरारी, वाढीव एफ.एस.आय. यांसारखे वाद तुझ्या आसपासही फिरकू शकले नाहीत.. पण या गोष्टीचं म्हणावं असं कौतुक नाही झालं राहुल.. किंवा कदाचित स्वतःच्या वृत्तीचं "मार्केटिंग" करणं तुला पचनी पडलं नसेल.. पण आज तू निवृत्त होताना स्वतःच्या वृत्तीचं-प्रतिमेचं मार्केटिंग करायचं नसतं हे मूल्य भारतीय फलंदाजीचे मैदान सोडणार आहे.. जाहिराती करताना सचिन-धोनी आणि कंपनीचे मिळकतीचे आकडे - ब्रॅंड सदैव चर्चेत राहिले.. पण आम्हाला राहुल द्रविड दिसला तो,बाबा आमटेंच्या आनंदवनासाठी - हेमलकसाच्या लोकबिरादरी प्रकल्पासाठी मदतीचे आवाहन करताना... आणि ते सुद्धा मराठीत करताना..!
सामाजिक सामिलकीचं हे निर्मोही वृत्तीचं लेणं आज तुझ्या निर्णयाने निवृत्त होतंय !



लिहावं तितकं थोडंच आहे..
राहुल कुसुमाग्रजांच्या "कणा" या कवितेतील लढवय्यी मानसिकता ही तुझी खासीयत.. तू यापुढेही जे कोणते क्षेत्र निवडशील त्यात तुला "विजेता" करेलंच ! [ तसा तू डॉ. विजेता राहुल द्रविड आहेस याचेही भान आहे मला.. ! ] पण तुझी ही वृत्ती-मानसिकता आणि संस्कार आम्हाला मिळोत याच अपेक्षांसह ,

तुझा स्नेहाभिलाषी,
स्वरूप पंडित.   

Sunday, 26 February 2012

My all time favourite song in Marathi...!!!!!

 

 

कर्तव्याने घडतो माणूस - मनोहर कवीश्वर

ऐनयुद्धाच्या वेळी रणांगणावर मोहवश झालेल्या अर्जुनाला युद्धासाठी तयार हो हे समजावताना श्रीकृष्णाने केलेला उपदेश आणि गीतेतील अंश काव्यरूपात मांडला आहे.

विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था
कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरूषार्था ॥धृ॥

शस्त्र त्याग तव शत्रू पुढती नच शोभे तुजला
कातर होसी समरी मग तू वीरोत्तम कसला
घे शस्त्र ते सुधीर होऊन रक्षाया धर्मार्था
कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरूषार्था ॥१॥

कर्तव्याच्या पुण्यपथावर मोहांच्या फूलबागा
मोही फसता मुकशिल वीरा मुक्तीच्या मार्गा
इह तव लोकी अशांतीने तव विक्रम झुकवील माथा
कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरूषार्था ॥२॥

कुणी आप्त ना कुणी सखा ना जगती जीवांचा
क्षणभंगुर ही संसृती आहे खेळ ईश्वराचा
भाग्य चालते कर्मपदांनी जाण खऱ्या वेदार्था
कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरूषार्था ॥३॥

रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो
कौरवात मी पांडवांत मी अणुरेणूत भरलो
मीच घडवितो मीच मोडितो उमज आता परमार्था
कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरूषार्था ॥४॥

कर्मफुलाते अर्पून मजला सोड अहंता वृथा
सर्व धर्म परी त्यजून येई शरण मला भारता
कर्तव्याची साद तुझ्या तुज सिद्ध करी धर्मार्था
कर्तव्याने घडतो माणूस जाणुन पुरूषार्था ॥५॥

Friday, 9 September 2011

"टग्यां"चे बायो फ्युएल !

आपण आपल्या आयुष्यात कित्येकदा अशिक्षित, मस्तीखोर आणि उडाणटप्पू मुलांना वाटेल तसे बोलतो. कित्येकदा तर स्वतःचा भूतकाळही विसरून. पण सामान्यपणे असे दिसून येते की, अशा युवक-युवतींमध्येच समाज परिवर्तनाची-स्वयंसेवेची आणि एखादी अशासकीय संस्था सुरू करून तिच्या मार्फत देशसेवा करण्याची प्रचंड क्षमता असते. या उर्जेला चालना किंवा वाव देण्यात समाज म्हणून आपण खूप कमी पडतो.

त्याचवेळी या उर्जेला, अंगभूत आक्रमकतेला आकर्षून घेणारी गुन्हेगारी प्रवृत्ती अथवा दहशतवादी संघटनेसारखी यंत्रणा मात्र समाजात सक्रीय असते. आणि त्यातूनच युवकांच्या चिंतनाचे युनिट जे खरे तर देश-राष्ट्र किंवा विश्व असायला हवे ते बदलून अगतिकतेने जाती-प्रांत-राज्य-विचारधारा हे होते.. हीच शक्ती अशा तुलनेने क्षुल्लक बाबींसाठी आपल्या आयुष्याचे रान करते... जीवावर उदार होण्यास तयार होते.. 

आपण नेहमीच दहशतवादी हल्ल्यानंतर त्यामागील "अर्थकारणाचा" विचार करतो पण क्वचितच यामागील बाहेर पडण्यास वाव नसलेल्या युवा शक्तीबद्दल बोलतो किंवा चिंतन करतो. कोणत्याही माणसाला केवळ आर्थिक अंगांनी तपासून चालत नाही. कोणाचीही केवळ आर्थिक पार्श्वभूमी हे गुन्हेगारीचे उगमस्थान असत नाही. उलट त्या बरोबरीनेच सामाजिक अन्याय, स्वतःवर - स्वतःच्या कुटुंबियांवर होणारे अन्याय आणि अंगभूत उर्जा वापरता न आल्याने हे अन्याय दूर करण्यात आलेले अपयश यातून मग आपली ताकद वापरण्याची किंवा जमेल तेव्हढ्या पातळीवर कोणालातरी शिक्षा ठोठावण्याची अनावर उर्मी निर्माण होते आणि त्यातून आपण असे युवक आणि युवती गमावितो.

आज भारतात किंवा कोणत्याही देशात आपण उर्जा किंवा इंधनाचा अपव्यय टाळण्याबद्दल जाहिरातींमधूनही आग्रही आवाहन करतो. पण आपल्याच देशातील ही टगे नावाची अगणित "बायो-फ़्युएल" आपण नियमीत जाळत असतो. त्याचा कोणताही विचार किंवा त्यासाठी मोजल्या जाणाऱ्या सामाजिक गुंतवणूकीच्या दामाची तमा न बाळगता... २०२० मध्ये भारत महासत्ता बनू शकतो असे जेव्हा डॉ. कलामांसारखे, डॉ. रघुनाथ माशेल्करांसारखे विचारवंत म्हणतात तेव्हा "जगाच्या आर्थिक उलाढालींमध्ये स्वतःचं इमान राष्ट्रासाठी देण्याची वृत्ती" अंगी बाळगण्याची क्षमता असलेल्या या बायो-फ्युएल बद्दल त्यांचा अभ्यास असतो आणि त्याना याची जाणीव असते म्हणूनच...

आपल्यासमोर प्रश्न उरतो की मग या उर्जेला कोणत्याही विद्यापीठीय चौकटीत न बसविता आपल्याला "Channelise" कसे करता येईल ? अनेक पर्यायांचा, आयामांचा आणि अंगांचा आपल्याला विचार कारावा लागेल. त्यामध्ये एकीकडे युवकांच्या गरजा, त्यांची अपेक्षा यांच्याबरोबरीने स्वयंसेवी संस्थांसमोरील अडचणी - त्यांच्या गरजा हेसुद्धा टिपावे लागेल. कदाचित समाजाच्या दृष्टीने "नाकाम" ठरवला गेलेला हा विद्यार्थी गट कार्यकर्ता म्हणून शिस्तबद्ध पद्धतीने प्रशिक्षित करता येवू शकेल.

आता या मुद्याचेही अनेक पदर आहेत. आपण या प्रशिक्षितांचे काय करायचे हा सर्वात मुख्य मुद्दा. एक म्हणजे त्यांना विविध सेवाभावी संस्थांमध्ये व्यापक प्रमाणावर संधी आहेत. कारण आज अनेक उत्तमोत्तम सेवाभावी संस्थांमध्ये अशा प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता आहे. आणि त्यामुळेच कित्येक संस्थांना आपल्या कार्यक्षमतेवर आणि त्याच अनुषंगाने आपल्या महत्त्वाकांक्षेवर चाप लावावे लागत आहेत. कदाचित आपण असे मनुष्यबळ स्वयंसेवी संस्थांसाठी वापरू शकू.

आज आपल्याला हे जाणवते की उच्च शिक्षण घेणाऱ्यांची समाजाशी असलेली नाळ हळूहळू तुटत चालली आहे. आणि याचे एक मुख्य कारण म्हणजे सामाजिक संपर्काला विद्यापिठीय अभ्यासात काही निवडक कोर्स वगळता फारसा वाव नाही. तेव्हा आपण प्रशिक्षित केलेले मनुष्यबळ हे युवकांची सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक सामिलकी यांना आपोआपच चालना देवू शकेल. किंबहुना थोडे पुढे जाऊन मी अधिक व्यापक मुद्दा मांडू इच्छितो तो हा की, जसे काही राष्ट्रांत सक्तीची लष्करी सेवा अस्ते तशीच आपण ही एक प्रकारची स्वेच्छा पण सामाजिक सेवा मांडू शकतो. त्यापुढे जाऊन मला असे वाटते की, भारताच्या "कौशल्य विकास कार्यक्रमाचा" [Skill Developement Programme] वापर आपण या प्रशिक्षणासाठी केल्यास त्यातून काही फायदे होवू शकतील. एक म्हणजे "सेवाभाव" हा भारताचा सहज सुलभ आत्मा आहे. भारत हा अजूनही  खेड्यांचा देश आहे हे मान्य केल्यास सामाजिक जाणिवांच्या बाबतीत खेडी आजही तल्लख आहेत. आणि विकसित देशांची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने सेवा क्षेत्रावर आधारलेली आहे. याचाच अर्थ नागरीक अथवा सरकार म्हणून आपल्यावर एव्हढीच जबाबदारी आहे की, सेवाभावी वृत्ती, सामाजिक जाणीवा आणि सेवा क्षेत्र यांची सांगड आपल्याला घालता आली पाहिजे. भारतासमोरील ग्रामविकासाच्या आव्हानात आणि PURA सारख्या योजनांच्या बरोबरीने आपण जर या मुद्याचे भान ठेवले तर, आपल्याला एका नवीन परिमाणाने काम करता येईल.

या प्रशिक्षणाचा अजून एक फायदा असेल तो म्हणजे This will BRIDGE the ideological gap between volunteers and government sector. कार्यकर्ता म्हणून काम करताना स्वतःच पोळलेले असल्याने निव्वळ विरोधासाठी विरोध करण्याची मानसिकता आपोआपच कमी होवू शकेल.

एका दृष्टीने यातूनच आपण "नागरी समाजाची" [Civil Society] ची बांधणी करू शकू. मूळात नागरी समाज याचा अर्थ नेमका काय होतो हे सुद्धा यानिमित्ताने जरा तपासून पाहुया. समाज म्हटला की त्याची स्वतःची अशी ओळख अर्थात अस्मिता आली. आणि मग सामान्यपणे ती जात-धर्म-भाषा-प्रांत-राज्य-संस्कृती अशा घटकांमध्ये पाहिली जाते. त्याच्या पलिकडे जाऊन एका देशाचे "नागरीक" म्हणून स्वतःची अस्मिता ओळखू पहाणारा समाज हा खऱ्या अर्थाने नागरी समाज म्हणता येवू शकेल. आणि प्रशिक्षित युवा मनुष्यबळ हे अशाच समाजाच्या उभारणीसाठी मदत करू शकेल.

सारांश : एक छोटासा प्रशिक्षण कार्यक्रम किंवा अभ्यासक्रम उर्जाशील युवकांना चालना देवू शकेल. त्यांना समाजातील देशविघातक शक्तींच्या संपर्कात येण्यापासून रोखू शकेल. त्यातून देशाचा नागरी समाजही विकसित होईल. स्वयंसेवी संस्थांना मनुष्यबळ मिळू शकेल आणि सर्वात मुख्य म्हणजे आजच्या युवकाबद्दल समाजात विश्वासाचे वातावरण तयार होईल. टग्यांच्या रूपातील हे  "बायो फ्युएल" आजवर "ऑईल शॉक" देणाऱ्यांनाच चटके देवू शकेल.