Thursday, 16 December 2010

हे चक्र भेदता येईल काय ?

कायद्याचे पालन करणारा पापभिरू सामान्य नागरिक... कुटुंबाची परवड करूनही शक्यतो कायदेभंग न करू शकणारी ही मंडळी... समोर कायद्याचे नियमित उल्लंघन करणाऱ्यांनी उभी केलेली आव्हाने... क्लिष्ट आणि गुंतागुंतीची विधीप्रक्रिया... न्यायमंडळे आणि कायद्याच्या संरक्षकांकडून संरक्षण मिळायची शक्यता जवळ-जवळ शून्य... आदर्शवादी तत्वे... आणि ही आव्हाने कायद्याच्या चौकटीतूनच सोडवायचा पर्याय..... याची परिणती म्हणजे सातत्याने येणारी निराशा आणि हतबलता....

       दैनंदिन जीवनात, प्रवासात, मनमोकळ्या गप्पा मारताना समाजात एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवत आली... आपण सगळेच अन्यायाच्या एक दुष्टचक्रात अडकलो आहोत. हे चक्र अभेद्य आहे का ? निश्चितच नाही. मग या चक्रामधून मुक्त होणाऱ्यांपेक्षा, या चक्रामध्ये अडकणाऱ्यांची संख्या अधिक का असावी ? या प्रश्नाने माझा बराच पिच्छा पुरवला होता, आजही यावर मला फार काही अधिकाराने बोलता येईल अशातला भाग नाही. पण कुठेतरी या चक्राच्या अभेद्यतेमागील एक कारण मला जाणवले.... Actually, the reason behind this is, we are fighting with ill-legal elements "legally"... आपण बेकायदेशीर समाजघटकांशी आणि अडचणींशी कायद्याच्या चौकटींतून लढायचा प्रयत्न करतो आहोत...


     मूळात कायदा हा संपूर्ण मानवी वर्तन नियंत्रित करूच शकत नाही. कारण परिस्थिती सापेक्ष मानवी प्रतिसाद हे बदलते असतात, परिवर्तनशील असतात. अशा संभाव्य प्रतिसादांची शक्यता लक्षात घेऊन सार्वकालिक आणि शाश्वत कायदे तयार करणे हे जवळ-जवळ अशक्य आहे. मग, अशा कायद्याच्या मदतीने बेकायदेशीर घटकांचा पराभव करणे हे कसे शक्य होईल ?


      त्यात आजही सामान्य माणसे लढताना दिसत नाहीत अशी तक्रार असते... माझीही ही तक्रार आहे.. आता हेच पहाना...

      शीतपेयांच्या बाटल्या विकत घ्यायच्या झाल्या द्या १-२ रुपये अधिक... बसचे तिकीट काढायचे झाले, वाहकाजवळ सुट्टे नाहीत, घालवा काही रुपये.. रेल्वे वाहतूकीचा पर्याय स्विकारावा तर प्रत्येक गाडी किमान १५-२० मिनीटे उशीराने धावते.. घरचा दूरध्वनी संच महिना-महिना बंद असतो पण बिलातील स्थिर मासिक आकार मात्र भरावाच लागतो.. पेट्रोलचे भाव एका वर्षात १६ रुपयांनी वाढतात आणि तेही जागतिक बाजारपेठेत या उत्पादनांचे भाव तौलनिक दृष्ट्या तसे स्थिर असताना.. मोबाईल कंपन्यांच्या "कस्टमर केयर"ला कॉल केला असता आपण कित्येक मिनीटे "प्रतिक्षेत" असतो, परिणामी आपले बिल हकनाक वाढते.. कुरियर कंपन्यांच्या पावत्यांवर "आतील वस्तू गहाळ झाल्यास आम्ही जबाबदार नाही" असे लिहिलेले असते आणि त्यावर आपल्याला सही करावी लागते.. आपण ती मुकाट्याने करतोही... पण आपण भांडतो का ? आपण पेटून उठतो का ? [माझी एक फॅंटॅसी आहे की सहज एखादवेळी हे ग्राहकाने म्हणावे.. की या बिलातील रक्कम देताना रुपयाच्या नोटा खोट्या आल्यास आम्ही जबाबदार रहाणार नाही... चालेल का ?]


     दैनंदिन जीवनात आपल्या विरोधात असंख्य घटना घडतात.. आपल्यावर प्रचंड अन्याय होतो.. आपण कायद्याच्या चौकटी पाळत असतो मात्र तरिही कायद्याची आपल्यालाच भिती वाटत रहाते.. खिशात योग्य किंमतीचे तिकीट असतानाही समोर तिकिट तपासनीस आला की आपल्या उरातील धडधड वाढते. आणि आश्चर्य म्हणजे आपल्याला या साऱ्याचा त्रास होत नाही.. चिडचिड होत नाही.. हीच माझी अस्वस्थता आहे... की का ? आपण का चिडत नाही ? आपण का बंड करत नाही ? आपण का लढत नाही ? आपण अधिकाधिक निष्क्रिय होतो, हतबल होतो... पण आपण संतापत नाही.. आणि यात मी ही आलोच... मला याची लाज वाटते..


     पण लाज वाटल्याने परिस्थिती बदलत नाही. हे असे का होत असावे याचाही विचार झालाच पाहिजे. मला जाणवते की बहुधा वाढते "बॅटल फिल्ड" हे याचे कारण असू शकेल... की अगदी घरातून बाहेर पाऊल टाकल्यापासून प्रत्येक श्वासासाठी लढावे लागणे आणि नैतिक दृष्ट्या योग्य वागूनही, कायदेशीररित्या बरोबर असूनही न्याय न मिळण्याचीच शाश्वती असणे यामुळे "पेटण्याऐवजी" सामान्य माणूस "विझत" असावा.. असे म्हटले तर मग आपल्यावरील जबाबदारी अधिक वाढते. कारण अशा वेळी आपण "बॅटलफील्ड" कमी करण्यासाठी काय करता येइल याचा विचार करायला हवा.

आपल्याला जमेल ? can we..?

No comments:

Post a Comment