Wednesday, 24 August 2011

अभूतपूर्व !


निदान आपल्या पिढीला तरी याच शब्दात अण्णांना मिळालेल्या पाठिंब्याचे वर्णन करावे लागेल... अत्यंत सभ्य, सुसंस्कृत, चारित्र्यसंपन्न आणि शांततामय व्यक्ती आजच्या बदलत्या परिस्थितीतही समाजाचा किती विश्वास संपादन करू शकते याचे १६ ऑगस्ट, २०११ पासून सुरू झालेले आंदोलन हे एक अतिशय उत्तम उदाहरण आहे. एकाच वेळी दैनंदिन जीवनात वाट्याला आलेली अगतिकता, भ्रष्टाचाराचे पदोपदी भोगावे लागणारे परिणाम, सरकारच्या मनमानी विरोधातील असंतोष आणि राजकीय पक्षांकडून वारंवार होणारा अपेक्षाभंग याची परिणती अर्थातच अण्णांना मिळणाऱ्या पाठिंब्यात झाली. एखाद्या राजकीय पक्षाला आजही आपल्या सभेसाठी उपस्थिती "जमवावी" लागते.. आजही करमणूकीच्या कार्यक्रमांच्या जाहिराती कराव्या लागतात... आजही स्पॉन्सर्स शिवाय कार्यक्रम करणे मग ते दृक्‌-श्राव्य माध्यमांत असोत अथवा श्राव्य माध्यमांत... आजही कठिण आहे.. असे असताना वृत्तपत्र वाहिन्यांसहित सर्वच प्रसारमाध्यमांना एकच विषय उचलून धरावा लागला आहे... याचे नेमके कारण काय असेल ? एकच नेता आपल्या साध्या शब्दांत काही एक आवाहन करतो... जनता कधी प्रत्यक्ष - कधी कोणामार्फत तर कधी संपर्कक्रांतीच्या साधनांद्वारे ते आवाहन ऐकते... अशा नेत्यावर सरकार निर्बुद्धपणे कारवाई करते आणि उत्स्फुर्तपणे जनसागर रस्त्यावर उतरतो... लहान मुले, गरोदर स्त्रीया, वृद्ध नागरीक, अंध-अपंग नागरीक, पक्षीय कार्यकर्ते सगळेच स्वतःहून रस्त्यावर उतरतात... आणि ते सुद्धा स्वतःची अस्मिता विसरून .... या चमत्काराचे कारण नेमके कोणते असेल ?
खरे तर याचे सर्वात पहिले कारण हे आहे की... अण्णांनी आपल्या लढ्याचे स्वरुप एकदम सोप्या-सोप्या कृतींनी मांडले. उदाहरणार्थ : १५ ऑगस्टला संध्याकाळी ८ ते ९ या वेळेत घराघरातील दिवे मालवा. भारत माता की जय आनि इन्कीलाब जिंदाबाद अशा घोषणा द्या.. जमेल तितका वेळ उपास करा... आंदोलनाचे लघुसंदेश [ SMS ] जमतील तितक्या लोकांपर्यंत पाठवा... या सगळ्या अशा कृती होत्या की ज्या कोणासही करणे सहज शक्य होते. शिवाय, त्यातून देशभक्ती व्यक्त केल्याची मिळणारी जाणीव आत्मसन्मान देणारी होती.
या कारणा व्यतिरिक्त अजून एक कारण म्हणजे भारतीय नागरीकांच्या मनांत असलेल्या असंतोषाला वाट करून देण्यासाठी विश्वासार्ह व्यक्तीमत्वाची गरज होती. अण्णांनी ती पूर्ण केली. स्वतःचे स्वच्छ- निष्कलंक चारित्र्य, निस्पृहता यातून ही कमाई अण्णांनी केली होती. आणि मग इतर अनेक कारणे आहेत जसे आंदोलन शांततामय मार्गाने जाणारे असल्याने त्यात धोके कमी होते, सरकारच्या उद्दामपणाला संघटीतपणे विरोध करता येतो हे जनतेला एप्रिल मधील अण्णांच्या यशाने जाणवले होते, इजिप्त-ट्युनिशिया-येमेन मधील घटानांनी भारतीय युवा मानसिकतेचा वेध घेतला होता...

पण मला अण्णांच्या यशा इतकाच त्यांच्यावर घेतलेल्या आक्षेपांचा अधिक गांभीर्याने विचार करावासा वाटतो. कारण प्रसारमाध्यमे आणि सरकार या विषारी आक्षेपांनी लोकशाहीची व्याख्या मलीन करीत आहेत असे माझे मत आहे.
यातील सर्वात पहिला आक्षेप असतो की अण्णांचे आंदोलन हे लोकशाही विरोधात आहे. लोकशाहीच्या मूळ तत्वांना बाधक आहे.

या प्रश्नाच्या उत्तराकडे वळताना भारतासारख्या देशात गणिती भाषेत लोकशाही म्हणजे काय याचा विचार करुया.
भारतात ५१ = १०० आणि ४९ = ० हे लोकशाहीचे समीकरण आहे. [ बहुमताने घेतले जाणारे निर्णय ] 
या पार्श्वभूमीवर अण्णांचे आंदोलन हे लोकशाही विरोधी ठरते का हे तपासणे गंमतीचे ठरेल.
१] भारताचे पंतप्रधान हेच मूळात प्रत्यक्ष निवडणूकीद्वारे निवडून आलेले लोकप्रतिनिधी नाहीत.
२] जे सरकार आज केंद्रात बसले आहे, ते सुद्धा भारतातील एकूण मतदारांच्या संख्येपैकी निम्म्याहून अधिक मतदारांच्या पाठिंब्याने आलेले नाही. म्हणजे ५१=१०० हा फॉर्म्युला तेही सहजपणे वापरू शकत नाहीत.
३] याच पंतप्रधानांच्या कार्यकाळात शिवराज पाटील नावाचे एक केंद्रीय कॅबिनेट मंत्री विराजमान होते. ज्यांना त्याच लोकसभा निवडणूकीत जनतेने नाकारले होते. त्यांचा पराभव झाला होता. असे असताना त्यांना राज्यसभेवर पाठविणे, त्यांना मंत्री करणे आणि त्यातही गृह खात्यासारखे क्रमांक एकचे खाते देणे यांत मतदारांचा अपमान नव्हता का ?
४] अण्णांच्या "जन लोकपाल विधेयका"चा मसुदा तयार करणाऱ्या चर्चा समितीत विद्यमान केंद्र सरकारने एकाही विरोधी पक्षाच्या प्रतिनिधींना बोलाविण्याची तसदी घेतली नव्हती.
ही यादी थांबणारी नाही. आजवर जैतापूर सारखा प्रकल्प असो, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स चा प्रश्न असो, भारत -अमेरिका अणू कराराचा प्रश्न असो, राष्ट्रीय सल्लागार मंडळाचा असो सरकारने कोणताही निर्णय "लोकशाहीचा सन्मान" राखून घेतला असल्याचे जाणवत नाही.

या आंदोलनासंदर्भातील दुसरा आक्षेप हा असतो की सदर आंदोलनामुळे संसदेच्या सार्वभौमत्वास बाधा पोहोचते.
आजवर वाचलेल्या पुस्तकांच्या आधारे मी असे ठामपणे म्हणू शकतो की, आपल्या या देशात भारतीय संविधानाच्या सरनाम्यानुसार भारताची जनता सार्वभौम आहे आणि हे सार्वभौमत्व प्रतिकात्मक प्रातिनिधिक रूपात संसदेमध्ये अनुस्युत झाले आहे. याचा अर्थ इतकाच की जसे एखाद्या आंदोलनामुळे संसदेचे सार्वभौमत्व धोक्यात आल्याचा साक्षात्कार सरकारला होतो तसाच आपल्या कोणकोणत्या कृतींमुळे भारताच्या नागरीकांचे सार्वभौमत्व धोक्यांत येते याचा अभ्यासही सरकारने करणे अपेक्षित आहे.
आता संसदेचा म्हणून काही एक सन्मान आहे आणि अण्णांच्या आंदोलनामुळे त्यास बाधा पोहोचते का ? दुर्दैवाने याही प्रश्नाचे उत्तर सरकारच्या बाजूने देता येत नाही. कारण जरी काही अंशी प्रसारमाध्यमांमधून असे भासवले जात असले अथवा  पूर्णांशाने सरकार जरी म्हणत असले की अण्णांची मागणी "जन लोकपाल विधेयकाचा" मसुदाच संसदेने मंजूर कारावा अशी आहे तरी वस्तुस्थिती भिन्न आहे. वस्तुस्थिती ही की अण्णांची मागणी एव्हढीच आहे की जन लोकपाल विधेयकाचा मसूदा संसदेच्या पटलावर ठेवला जावा .. आणि या मागणीने संसदेच्या विशेषाधिकारांवर कशी काय गदा येते हे केवळ सरकारी "तज्ज्ञ वकील"च सांगू शकतील.

या आंदोलनातील तिसरा आक्षेप आहे की अण्णा हे लोकप्रतिनिधीही नाहीत अथवा सिव्हिल सोसायटीचे प्रतिनिधीही नाहीत.
आता यातही वस्तुस्थिती एव्हढीच रहाते की अण्णा हे विद्यमान केंद्र सरकारने आमंत्रित अथवा गठित केलेल्या सिव्हिल सोसायटी प्रतिनिधी मंडळावर नाहीत.  कारण जिच्या तालावर केंद्र सरकार नाचते त्या National Advisory Council [ जिच्या अध्यक्षा अर्थातच श्रीम. सोनिया गांधी आहेत, आणि ज्या परिषदेवरील सभासद हे सरकारचे पगारदार किंवा नेमक्या भाषेत सांगायचे तर मानधनदार बाहुले आहेत ] त्या परिषदेला तरी कोणत्या पद्धतीने जनतेने निवडून दिले आहे ? आणि जर तिला जर विविध "जनहिताची" विधेयके मांडण्याचा हक्क असेल तर मग अण्णांचे लोकप्रतिनिधी नसणे जन लोकपाल बिलाच्या आड का यावे ?

या आंदोलनावरील चौथा आक्षेप हा आहे की अण्णा उपोषणाद्वारे केंद्र सरकारला ब्लॅकमेल करीत आहेत.
मूळात स्वतंत्र भारतातील राज्ये ही संकल्पनाच "उपोषणावर" आधारलेली आहे. कारण आंध्र प्रदेश हे स्वतंत्र राज्य असावे म्हणून दिवंगत श्री. पोट्टी श्रीरामलू यांनी सर्वप्रथम उपोषण केले होते.. त्यातच त्यांचे निधन झाले... भारतातील राज्यांची पुनर्रचना करणारा फाजल अली आयोग हे या मृत्यूचेच फलित आहे. मग भारतातील राज्यांची निर्मिती ही ब्लॅकमेलिंग द्वारे झाली आहे असे म्हणण्यास आजचे राज्यकर्ते तयार आहेत का ? चालू आर्थिक वर्षाचा रेल्वे अर्थसंकल्प ज्यांनी मांडला त्या विद्यमान केंद्र सरकारमधील माजी रेल्वे मंत्री ममता बॅनर्जीच काही महिन्यांपूर्वी सिंगुर प्रश्नावर लाक्षणिक उपोषणास बसल्या होत्या. मग अशा ब्लॅकमेलिंग करणाऱ्या व्यक्तीची वर्णी केंद्र सरकारमधील महत्त्वाच्या खात्यावर कशी काय लागली, याचे सरकार काही स्पष्टीकरण देवू शकेल काय ?

आक्षेप क्रमांक ५ : अण्णांनी जन लोकपाल विधेयकासंदर्भात चर्चा करायला हवी होती.
मूळात २३ एप्रिल रोजी श्रीम.किरण बेदी यांनी ५ एप्रिल आणि १६ ऑगस्ट असे आंदोलनाचे दिवस घोषित केले होते.ऑगस्ट महिन्यातील आंदोलन सुरू करण्यापूर्वी अण्णा हजारे स्वतः भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल अशा सर्वच पक्षांशी आणि पक्षप्रमुखांशी जन लोकपालच्या मुद्द्यावर चर्चा केली होती. त्याचवेळी त्यांनी श्रीम. सोनिया गांधी यांच्याकडेही चर्चेसाठी वेळ मागितली होती जी त्यांना नाकारण्यात आली.आता कॉंग्रेस पक्षात देशाचा पंतप्रधानही स्वयंप्रेरणेने निर्णय घेत नाही हे सर्वश्रुत आहे. आणि १६ ऑगस्ट ही आंदोलनाची नियोजित तारीख माहिती असूनही सोनियाजी आपल्या आरोग्यविषयक उपचारांसाठी अमेरिकेत गेल्या. [ या अमेरिका वारीमध्ये त्यांचे वैद्यकीय सल्लागार, अथवा सरकारी डॉक्टर अशांपैकी कोणाचाही समावेश नाही.तसेच त्यांच्या आजारा बद्दलही सरकारतर्फे प्रचंड गोपनीयता पाळली गेली आहे. योगायोगाने, जनता पार्टीच्या सुब्रमण्यम्‌ स्वामी यांनी सोनियांच्या परदेशातील विविध बॅंकांमध्ये असलेल्या पैशांबद्दल न्यायालयात दाखल केलेल्या खटल्यांमधील तपासाने "नेमका याच वेळी" वेग घेतला आहे. हसन अली याचे ३०० मिलीयन डॉलर्सचे अकाउंट अमेरीकेतील एका बॅंकेने फ्रीझ केले आहे. आणि सोनिया सध्या अमेरीकेत आहेत. काय "योगायोग" जुळून आला आहे नाही  ! ]  तर पक्षप्रमुख अमेरीकेत आणि पक्षातील बाकीचे नेते स्वयंनिर्णयास असमर्थ. [ किंबहुना देशाच्या गृहमंत्र्याना दिल्ली पोलिसांच्या कारवाई बद्दलही कल्पना नसते ! ] अशावेळी अण्णांनी नेमकी कोणाशी चर्चा करणे अपेक्षित आहे ?

आक्षेप क्रमांक : ६,  अण्णांनी भारतीय दंड विधान कलम १४४ आणि भारतीय गुन्हेगारी कायदा कलम १५१ चा भंग केला. म्हणजेच अण्णांनी जमावबंदीचा आदेश मोडला शिवाय ते तडजोडीसही तयार नाहीत. मूळात सरकार विरोधी आंदोलन.. तर त्याची जागा कोणती असावी, उपोषण किती दिवस करावे, त्यासाठी किती माणसे यावीत [ हा आकडा ५००० आहे, आणि २५ पेक्षा जास्त गाड्या येवू नयेत असेही म्हटले गेले आहे.]  किती वहाने असावीत, घोषणा कोणत्या द्याव्यात हे सारे जर सरकारच ठरविणार असेल तर ते चालेल का ? शिवाय सध्याचे सरकार उद्या विरोधी पक्ष म्हणून बसले तर ते तरी त्याकाळात एखादे जन आंदोलन उभारताना या आकड्यांची हमी देऊ शकेल काय ? आणि जर देवू शकणार नसेल तर अण्णांनाच हे नियम कसे काय लागू पडतात ?

आक्षेप क्र. ७ : मूळात आंदोलने करण्याचे स्वातंत्र्य भारताच्या राज्यघटनेमध्ये आहे का ? तर भारतीय नागरीकांना देशाच्या अखंडतेला- राष्ट्रीय ऐक्याला धोका निर्माण होणार नाही अशा बेताने संघटीत होण्याचे, अभिव्यक्तीचे आणि संघटना स्थापनेचे तसेच स्थलांतराचे स्वातंत्र्य आहे. आणि निषेध अथवा आंदोलन हा उद्विग्नतेच्याच अभिव्यक्तीचाच एक भाग आहे. म्हणजे हा मुद्दाही निकाली.   

आता माझेच अनेक आक्षेप आहेत... अण्णांच्या आंदोलनासंदर्भात विविध आक्षेप घेणाऱ्यांबद्दल
१] श्रीमती किरण बेदी आणि अरविंद केजरीवाल यांच्या संदर्भात असा एक आक्षेप घेतला जातो आहे की, ते आपल्या सरकारी सेवेच्या कारकीर्दीतील अपमानांचे सूड या आंदोलनाद्वारे घेत आहेत. मला सांगा, या देशातील तथाकथित लोकशाही मार्गाने निवडून आलेले नेते आपल्या "तथाकथित" अवमानाचे [म्हणजे एखादे भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर काढले जाणे,अथवा एखादे अनधिकृत बांधकाम पाडले जाणे किंवा गेला बाजार "उदात्त"हेतूंनी सुरू असणाऱ्या अनैतिक कृत्यांचा पर्दाफाश वगैरे...]  सूड संबंधित शासकीय अधिकाऱ्यांवर उगवतातच की नाही ? मग ती गडचिरोली सारख्या ठिकाणी बदली असेल किंवा किरण बेदींसारख्या अधिकाऱ्याना बढती देण्यात केली जाणारी टाळाटाळ असेल किंवा एखाद्या माहितीच्या अधिकारांचा वापर करणाऱ्या संजयला यमसदनी धाडले जाणे असेल...या वृत्ती बद्दल प्रसारमाध्यमे मूग गिळून गप्प असतात.मग सत्याने चालणाऱ्यांनी,अन्यायाविरुद्धा लढा उभारून,केवळ स्वतःचाच नव्हे तर प्रत्येक प्रामाणिक नागरीकाचाही फायदा व्हावा म्हणून जर नालायक सरकारवर-असत्यवाद्यांवर सूड उगवला तर त्यात आक्षेप घेण्यासारखे काय ?
२] दूसरे असे म्हटले जाते की, अण्णांनी दिलेला "टाईम स्पॅन" - विधेयकाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी दिलेला कालावधी हा विधेयकावरील चर्चा आणि त्या विधेयकाचे सर्व पदर तयार करण्यासाठी खूपच कमी आहे. मलाही सुरुवातीला असेच वाटत होते. पण हा कालावधी किमान एप्रिल ते ऑगस्ट इतका आहेच आणि एखादे सरकार किती "तळमळीने" विधेयक पारीत करू शकते हे महाराष्ट्र सरकारने रात्री दीड वाजत "राज्य जलसंपदा विधेयक" पास करून दाखवून दिलेच आहे, अशावेळी चार महिन्यांचा कालावधी सरकारला कमी का वाटावा ?
३] सरकारी विधेयकात म्हणजे लोकपाल विधेयकात [ अण्णांचे ते जन लोकपाल बरंका ! ] एक तरतूद आहे. या तरतुदी नुसार, ज्या तक्रारदाराने भ्रष्टाचाराविरुद्ध तक्रार केली आहे मात्र त्याची तक्रार खोटी आहे असे सिद्ध झाले तर "सरकारची दिशाभूल करणारी तक्रार केल्याबद्दल" तक्रारदाराला  किमान २ वर्षे कारावासाची शिक्षा सरकारी विधेयकात आहे. आता गंमत पहा, एखादी खोटी तक्रार आल्यास तक्रारदाराला किमान २ वर्षे शिक्षा पण जर भ्रष्टाचार आहे असे सिद्ध झाले तर संबंधित गुन्हेगाराला किमान ६ महिने शिक्षा ! सरकारी विधेयकात लावण्यात आलेला हा न्याय कोणता याचे सरकार काही स्पष्टीकरण देवू शकेल काय ?
४]  १६ ऑगस्ट रोजी सकाळी आंदोलनाची संभाव्य व्याप्ती "लक्षात घेऊन" सरकारने अण्णांना अटक केली. वर अण्णांना दिल्ली पोलिसांनी अटक केली असे सांगितले. शिवाय अण्णांना मिळणाऱ्या समर्थनाचा जोर लक्षात आल्यानंतर आंदोलनाची "व्याप्ती" बहुधा कमी झाली असे सरकारला वातले की काय ? कारण अवघ्या १२ तासांत आंदोलन तीव्र झाल्यानंतर असा कोणता साक्षात्कार सरकारला झाला की ज्यामुळे अण्णा सरकारला निर्दोष वाटू लागले आणि त्यांची  सरकारने सुटका केली ? सरकार याचे उत्तर देइल काय ?
५] किरण बेदींच्या आडमुठेपणामुळे सरकारची चर्चा निष्फळ होत आहे असाही आरोप सध्या निखिल वागळे, लोकसत्ता सारखी वृत्तपत्रे करीत आहेत. मूळात एप्रिल महिन्यांत सरकारने दिलेले वचन सरकार पाळू शकले नाही. एकदा सरकारवर ठेवलेला विश्वास सरकारनेच सार्थकी लागू दिला नाही. तेव्हा आता सरकारी मुखातून निघालेल्या वचनांवर अण्णांनी अथवा त्यांच्या टीमने विश्वास न ठेवणे हा अण्णांचा किंवा त्यांच्या टीमचा आडमुठेपणा म्हणता येईल का ? की त्याला सरकारच्या नाकर्तेपणाचे फलित आणि शिवाय स्वतःची अपयशे झाकण्याची केविलवाणी कृती म्हणावी लागेल ?

आणि याक्षणी मला थॉमस जेफरसन या अमेरीकन स्वातंत्र्यवीराचे विचार उद्धृत करावेसेअ वाटतात....
थॉमस जेफ़रसन या अमेरिकन स्वातंत्र्यसैनिकाचे विचार मी पुढे उद्धृत करीत आहे.

We hold these truths to be self-evident, that
all men are created equal, that they are
endowed by their Creator with certain
unalienable Rights, that among these are Life,
Liberty and the pursuit of Happiness. That
to secure these rights, Governments are
instituted among Men, deriving their just
powers from the consent of the governed, That whenever any Form of Government becomes
destructive of these ends, it is the Right of
the People to alter or to abolish it, and to
institute new Government, laying its
foundation on such principles and organizing
its powers in such form, as to them shall seem
most likely to effect their Safety and
Happiness. Prudence, indeed, will dictate that
Governments long established should not be
changed for light and transient causes; and
accordingly all experience hath shewn that
mankind are more disposed to suffer, while
evils are sufferable than to right themselves
by abolishing the forms to which they are
accustomed. But when a long train of abuses
and usurpations, pursuing invariably the same
Object evinces a design to reduce them under
absolute Despotism, it is their right, it is
their duty, to throw off such Government, and
to provide new Guards for their future
security. Such has been the patient
sufferance of these Colonies; and such is now
the necessity which constrains them to alter
their former Systems of Government.
यामध्ये लोकशाहीची व्याख्याही आली आहे.. लोकशाही देशातील नागरीकांची कर्तव्येही आली आहेत आणि नेमक्या कशा-कशाला लोकशाही कृती म्हणता येईल हे सुद्धा स्पष्ट झाले आहे. एखादे सरकार लोकशाहीच्या चौकटीत राहून कार्य करीत नसेल... Not only to the letters but even the very spirit of Democracy is being challenged by the government... तर अशा सरकारला त्याची "जागा दाखविण्याचे" काम करणे हे लोकशाही असलेल्या राष्ट्रातील नागरीकांचे मूलभूत कर्तव्य आहे.

तात्पर्य :
अण्णांचे आंदोलन हे लोकशाही विरोधी नसून भारतातील लोकशाहीचा आजवरचा सर्वात प्रगल्भ आविष्कार म्हणावा लागेल.



Tuesday, 16 August 2011

मी सरकार...शेतकऱ्यांवर वार, वृत्ती बेदरकार
भूसंपादनार्थ स्वार... मी सरकार !
मी सरकार...

मी सरकार...
हाणले टळक्यात सोटे चार
आया-बहिणींवरही गोळीबार
हा तर माझा जन्मसिद्ध अधिकार
भूसंपादनार्थ स्वार मी सरकार....

मी सरकार...
शेतकरी माझे शाश्वत वेठबिगार
कृषी-जलसंपदा या माझ्या नार
मी लवासा आणि उद्योगप्रिय फार
भूसंपादनार्थ स्वार.. मी सरकार...

मी सरकार...
सव्वापट महाग निविदा मला मंजूर
स्वतःच्याच शेतात शेतकरी ठरविला मजूर
माझी "भूक" न्याय्य, त्यांची मात्र "तहानच" फार
भूसंपादनार्थ स्वार, मी सरकार...

मी सरकार..
मला जाब कोण विचारणार ?
प्रश्नकर्त्यांना मिळेल सरकारी "पाहुणचार"
स्थानिक स्वराज्य संस्थाना आम्ही नाही जुमानणार
भूसंपादनार्थ स्वार.. मी सरकार...

मी सरकार !!!
धरणग्रस्तांना मी दाखले नाकरणार
वर्षानुवर्ष पुनर्वसन रखडवणार
७/१२ मात्र माझ्याच नावे होणार
हीच "बदलती" लोकशाही यार !
भूसंपादनार्थ स्वार... मी सरकार !
मी सरकार !

अण्णांना मार, गुरुच्या गळ्यात मात्र नाही फंदा-हार
अरुंधती बाईंसमोर गार, सोनियासमोर लाचार...
हीच आयुष्याची इतिकर्तव्यता, हेच आमच्या जीवनाचे सार !
भूसंपादनार्थ स्वार.. मी सरकार !!!
मी सरकार !....

Thursday, 14 July 2011

फार झालं... फार झालं..

फार झालं !
फार झालं !!
जगण्याचं दुःख अनिवार झालं...

एक देश, एक धर्म
तत्वाने या फाळणी झाली...
पुण्यपुरातन देशाची मात्र,
षंढ नेतृत्वा "हाती" चाळणी झाली !
चाळणीच्या प्रत्येक भोकाचं
आता अगदी भगदाड झालं !!
फार झालं... फार झालं...

स्वतंत्र भारताची
कसली ही परराष्ट्र निती ?
राष्ट्रीय हितसंबंधांनाच
देते जी मूठमाती !
संवेदनशून्य शासनवेदीवर
भारताच्या भव्यतेचं स्वप्नंही ठार झालं..
फार झालं.. फार झालं..

टंचाई-महागाई घेते,
आम आदमीच्या घामाचे घोट..
तोयबा-३१३- मुजाहिद्दीन कृपेने
दिवस रात्र घडती स्फोट
सभ्यतेच्या बुरख्याआड निष्क्रीयता,
हेच देशाचं जणू अनिवार्य "स्पिरिट" झालं !
फार झालं... फार झालं...

ना सौभाग्याची खात्री,
ना मरणाचे सुतक...
नकाशारहित प्रवासाने ,
जीवन झाले तुटक-तुटक...
प्रसारमाध्यमं-राजकारण्यांचं स्वार्थी मन,
राष्ट्रीय "क्रायसिस"वर स्वार झालं...
फार झालं.. फार झालं...

ठेवून द्यावी एकच थप्पड,
अतिरेक्यांच्या थोबाडावर..
गाडून थडगे, राष्ट्रद्रोह्यांचे
वरून थुंकावे त्याच्यावर...
"ठकासी असावे महाठक" हवा बाणा !
मोडक्या कण्यांनी जगणं बस्स झालं...
फार झालं... फार झालं ...
जगण्याचं दुःख अनिवार झालं !!!

काल पुन्हा एकदा निदान "प्रसारमाध्यमांतून" तरी मुंबई हादरली... नाही तरी मुंबईला काय ! फटाके, गॅस सिलेंडर आणि RDX सारखेच. फक्त प्रत्येकाचा संदर्भ वेगळा. ते नाही का... गुलाबाचंच फुल, पण देवाला वाहिलं की भक्तीचं प्रतिक, प्रेयसीला दिलं की प्रेमाचं आणि मृतदेहावर वाहिलं तर श्रद्धेचं... काहीसा तसाच मामला आहे हा स्फोटाचा निदान मुंबईकरांसाठी तरी.. अस्सं "मुंबई स्पिरिट" म्हणणाऱ्यांना वाटतं..
आणि आम्ही सुद्धा स्वाभिमान डिवचल्यासारखे.. संतापल्यासारखे वागत नाही...
आम्ही शांतच !


प्रसारमाध्यमं नेहमीसारखीच स्फोटाचा "इव्हेंट" कॅच करण्यासाठी तत्पर झाली होती. स्फोट किती वाजता झाला... स्फोटके नेमकी कशात होती...[ हा प्रश्न मुंबईच्या पोलिस आयुक्तांना एका पत्रकाराने विचारला आणि त्यांनीही साळसूदपणे "ती बहुधा छत्रीत होती", असं उत्तर दिलं.. या पत्रकाराला खरे तर पोलिस आयुक्तांनी स्फोटकं माझ्या खिशांत होती.. मीच ती सहज म्हणून आयुक्तालयातून ऑपेरा हाऊस येथे टाकली, असंच सांगायला हवे होते.. !]  प्रत्यक्षदर्शींना काय वाटलं... त्यांनी नेमकं काय पाहिलं.. [ त्यांनी खरे तर ब्रिटनी स्पियर्सला नाचताना पाहिलं होतं ना कबुतरखान्याजवळ !] असे प्रश्न पत्रकार "संवेदनशीलते"ने विचारत होते. यादेशाचे गृहमंत्री सुद्धा या स्फोटांच्या तपासासाठी दिल्लीहून एका विशेष विमानाने NSG ची तुकडी मुंबईला आल्याचे सांगत होते.
आणि एकालाही हे लक्षात येवू नये की, NSG हा युद्धजन्य परिस्थितीत लढणारा गट आहे. त्याचा तपासाशी काय संबंध ? आणि म्हणूनच या तुकडीला विशेष विमानाने मुंबईला पाठविण्याचा खर्च का केला गेला, असा प्रश्न विचारण्याचे कोणासही सुचले नाही..
आम्ही शांतच...


गेली ६५ वर्षे एक देश सातत्याने आपल्या कानाखाली आवाज काढतो आहे.. आपल्याला बुद्धीसामर्थ्याने झुंजवितो आहे आणि आमचे परराष्ट्र विभागाचे अधिकारी.. गृहमंत्री आदी मंडळी या देशाला "दहशतवादाचा अड्डा" किंवा "दहशतवादी कृत्यांचा तीव्र निषेध"या पलिकडे काहीच म्हणत नाहीयेत. पाकिस्तानच्या मुस्काटात ठेवून द्यायला हवी असे प्रत्येक नागरीकालाच वाटते. पण असा दबाव निर्माण करताना... मेणबत्त्या लाऊन आम्ही शांतच...

माझे मूळात काही प्रश्न आहेत... बहुधा माझ्यापुरते सुस्पष्ट आणि उत्तरे तयार असणारे... पण तरीही ते विचारायचा मोह आवरत नाहीये...
१] देशाचे कानफाट सुजेपर्यंत आपल्या शेजारच्या देशाने भारतात स्फोट घडवून आणले आहेत. पण आपल्याला त्यांच्या कानाखाली प्रोअ‍ॅक्टीव्ह जाळ काढणे अजूनही शक्य झालेले नाही यामागील कारणे नेमकी कोणती ?
अ] राजकीय औदासिन्य
ब] आंतरराष्ट्रीय कायदा आणि संकेत
क] भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा
ड] परराष्ट्र धोरणाचा अभाव की
ई] देशांतर्गत सुरक्षिततेचा प्रश्न
[ म्हणजे, समजा उद्या आपण युद्ध पुकारले तर, भारतातील ८-१० शहरांत एकाच वेळी २६/११ सारख्या घटना पाक युद्धकाळातही घडवून आणू शकेल ही भिती !]

२] ईस्राईल आणि अमेरिका २००८ पासून भारतीय हवाई तळांचा वापर करून पाकमधील अतिरेक्यांचे बेस उडवायला तयार आहेत. मग "डिप्लोमॅटिकली" पाहुण्याच्या चपलेने विंचू मारण्याची आपली तयारी अजूनही का नाही ?

३] मकबूल भट या काश्मीरी अतिरेक्याच्या सुटकेसाठी बर्मिंगहॅम येथील भारतीय उच्चायुक्त असणाऱ्या रवींद्र म्हात्रे यांची हत्या केली गेली. त्यांचा मृतदेह विदृप करून भारतात पाठविला गेला. त्याचा बदला म्हणून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भट याच्या संदर्भातील कागदपत्रे पूर्ण करून अवघ्या ८ दिवसांच्या आत त्याला फासावर लटकावले. ही अशी निर्णयक्षमता दाखविण्यात आपण का कमी पडतो आहोत ?

४] फाहिम अन्सारी आणि सय्यद सबाउद्दीन या मुंबई रेल्वे स्फोटांपासून जाळ्यात अडकलेल्या गुन्हेगारांना आपण आणि आपली न्यायव्यवस्था काहीही शिक्षा का करू शकलेली नाही ?

५] प्रसारमाध्यमांतून हे प्रश्न का विचारले जात नाहीत ?

६] भारतात उद्या "WEDNESDAY" सारख्या चित्रपटाची वास्तववादी आवृत्ती निपजल्यास भारत अंतर्गत सुरक्षितता सांभाळू शकणार आहे का ?

७] स्फोटांच्या बातम्या कशा हाताळल्या जाव्यात, त्यांचे संकलन-प्रसारण कसे केले जावे, अशा घटनांशी संबंधित पत्रकार परिषदांना कसे सामोरे जावे.. कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारावेत.. पिडीतांशी कसे बोलावे यासंबंधातील किमान संवेदनशील प्रशिक्षण झालेला पत्रकारच अशा स्वरुपाच्या घटना हाताळेल, हे पहाण्यासाठी सरकारने कोणती पावले उचलली आहेत का ?

८] "कामाशिवाय घराबाहेर पडू नका" या सरकारी सुचनेचा अर्थ काय होतो ? मुंबईकर सुट्टी नसताना, गर्दीच्या वेळात टाईमपाससाठी घराबाहेर पडतो असे शासनास सुचवायचे आहे का ?

९] आज भारतात इतके स्फोट झाले. पी.चिदंबरम‌ आणि आबा पाटील या कंपनीनेही अनेक दहशतवादी घटना हाताळल्या. तरीही अजून या देशाच्या मंत्र्यांना घटनेशी संबंधित बोलताना [ ज्यात कोणाचेही नांव अथवा राजकीय दृष्ट्या अडचणीत आणणारे उल्लेख नसतात ] लेखी परिपत्रक का लागते ?  त्यांना उत्स्फुर्तपणे योग्य-न्याय्य आणि मुत्सद्दीपणे बोलता येत नसेल तर त्यांना मंत्रीपद का दिले जाते ? आणि प्रसारमाध्यमे याबाबत मौन का पाळतात ?

१०] गुप्तहेर खात्याचा छोटा राजन मार्फत दाऊदशी शह-काटशहाचा खेळ चालू असतो. मुंबईचा पोलिस आयुक्त बदलतो आणि दाऊदविरुद्ध तीव्र होणे गरजेचे असणारी मोहीम छोटा राजन विरुद्ध तीव्र होते. आणि त्यात पोलिस दलातील काहींना पकडले जाते. आणि त्यानंतर स्फोट घडून येतात याचा अर्थ काय ?

या साऱ्या प्रश्नांची उत्तरे एक निरिक्षक म्हणून जाणवतात... कळतात...
म्हणूनच वाटतं...
फार झालं.. फार झालं..
जगण्याचं दुःख अनिवार झालं...
हे चित्र बदलता येइल ?

Tuesday, 1 March 2011

काही महत्वाच्या कविता...


या काही लाडक्या कविता...

त्यातही विशेषतः पहिल्या तीन या मला "निर्माण ब्लॉग" या अनुदिनीवर मिळाल्या... आणि त्यापुढील दोन "मालकंस" व "माणिक मोती" या ब्लॉग वर...
पैकी "निर्माण" हा ब्लॉग प्रत्येकाने आवर्जून वाचावा आणि त्यावर आत्मचिंतन करावे इतका अप्रतिम आहे... 

त्याला इलाज नाही

धिक्करिली तरीही सटवीस लाज नाही
श्रद्धा न पाठ सोडी त्याला इलाज नाही

देवातुनी जगाला ज्याने विमुक्त केले
त्यालाच देव करिती त्याला इलाज नाही

लढवून बांधवांना संहार साधणारा
गीता खुशाल सांगे त्याला इलाज नाही

तत्त्वज्ञ आणि द्रष्टे खंडून एकमेका
कथिती विरुद्ध गोष्टी त्याला इलाज नाही

ते भूत संशयाचे ग्रासून निश्चितीला
छळते भल्याभल्यांना त्याला इलाज नाही

विज्ञान ज्ञान देई निर्मी नवीन किमया
निर्मी न प्रेम शांती त्याला इलाज नाही

बुरख्यात संस्कृतीच्या आहे पशू दडून
प्रगटी अनेक रुपे त्याला इलाज नाही

असतो अशा जिवाला तो ध्यास मूल्यवेधी
अस्वस्थता टळेना त्याला इलाज नाही

ज्यांना अनेक छिद्रे असल्याच सर्व नावा
निर्दोष ना सुकाणू त्याला इलाज नाही

वृद्धापकाल येता जाणार तोल थोडा
श्रद्धा बनेल काठी त्याला इलाज नाही

-विंदा करंदीकर 


एवढे लक्षात ठेवा

उंची न अपुली वाढते फारशी वाटून हेवा
श्रेय ज्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा

ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी
ती न कामी आपुल्या एवढे लक्षात ठेवा

जाणती जे सांगती ते ऐकूनी घ्यावे सदा
मात्र तीही माणसे एवढे लक्षात ठेवा

चिंता जगी या सर्वथा कोणा न येई टाळता
उद्योग चिंता घालवी एवढे लक्षात ठेवा

विश्वास ठेवावाच लागे व्यवहार चाले त्यावरी
सीमा तयाला असावी एवढे लक्षात ठेवा

दुप्पटीने देत असे जो ज्ञान आपण घेतलेले
तो गुरूचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा

माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी
त्याने स्वत:ला जिंकणे एवढे लक्षात ठेवा

-विंदा करंदीकर
-------------------------------------------------------------

ते नावं बदलताहेत

ते नावं बदलताहेत
शहरांची घरांची विद्यापीठांची विमानतळांची
ही लागण वाढत जाईल
ते बदलतील नावं शब्दांची

भुकेला अन्न, तहानेला पाणी म्हणतील
माणसांना ग्राहक, मॉलला मंदिर-मस्जीद म्हणतील
घराला वेटींगरुम, पोराला इन्व्हेस्टमेंट म्हणतील

आत्महत्येला मुक्ती, वनवासाला संन्यास म्हणतील
गांधीला गोडसे, शिवीला ओवी, पुस्तकाला बॉम्ब म्हणतील

चला, आपणही त्यांच्या आरत्या ओवाळू
त्यांची पूजा करू, त्यांना साष्टांग नमस्कार घालू
आधी या शब्दांची नावं जरा आपणही बदलून घेऊ

-कविता  महाजन
------------------------------------------------------------------------------------
चिमुकल्या चोचीमधे आभाळाचे गाणे
मातितल्या कणसाला मोतीयांचे दाणे
उगवत्या उन्हाला या सोनसळि अंग
पश्चिमेच्या कागदाला केशरी हा रंग

देते कोण देते कोण देते कोण देते .......

सुर्या साठी उषा आणि चंद्रासाठी निशा
घरी परतण्या साठी पाखराना दिशा
मध खाते माशी तरी सोंडेमाधे डन्ख
चिकट्ला कोळी त्याच्या पायाखाली डिंक

देते कोण देते कोण देते कोण देते .......


नागोबाच्या फण्यावर दहाचा आकडा
खेकड्याचा प्रवासाचा नकाशा वाकडा
करवन्दाला चिक आणि आळूला या खाज
कुणी नाही बघे तरी लाजाळूला लाज

देते कोण देते कोण देते कोण देते .......


मूठभर बुल बुल हातभार तान
कोकिळेला गुरू नाही तरी गायी गान
काजव्याच्या पोटातून जळे लाल दिवा
पावसाच्या अगोदर ओली होते हवा

देते कोण देते कोण देते कोण देते .......


भिजे माती खाली तरी अत्तर हवेत
छोट्या छोट्या बियातून लपे सारे शेत
नाजूकश्या गुलाबाच्या भोवतीला काटे
सरळश्या खोडावर पुढे दहा फाटे

देते कोण देते कोण देते कोण देते .......

- संदीप खरे.
------------------------------------------------------------------

प्रलय - संदीप खरे



उगाच काय ग छोट्या-मोठ्या गोष्टींवरून इतके वाद?
उगाच काय माझ्यासकट जगण्याचाही सोडतेस नाद?

मी, तू, जगणे, पृथ्वी कुणीच इतके वाईट नाही
अधीरपणावाचून इथे दुसरे कोणी घाईत नाही


अगं विरस व्हावा इतके काही उडाले नाहीत इथले रंग
स्पेशल इफेक्टशिवायसुद्धा शहारून येऊ शकते अंग

अजून आहे आकाश निळे, अजून गुलाब नाजूक आहेत
अजून तरी दाही दिशा आपल्या आपल्या जागी आहेत

पैसे भरल्यावाचून अजून डोळा तारे दिसत आहेत
झाडांच्याही सावल्या अजून विनामूल्य पडत आहेत

अजूनतरी कर नाही आपले आपण गाण्यावर
सा अजून सा च आहे , रे तसाच रिषभावर

अजून देठी तुटले फूल खाली पडते जमिनीवर
छाया पडता पायाखाली, सूर्य असतो डोईवर

स्पोँसर केल्यावाचून अजून चंद्र घाली चांदडभूल
अजून कुठल्या वचनाशिवाय कळी उमलून होते फूल

सागर अजून गणती वाचून लाटेमागून सोडी लाट
अजून तरी कुठलीच जकात घेत नाही पाउलवाट

थंडी अजून थंडी आहे, ऊन आहे अजून ऊन
पाउस पडता अजूनसुद्धा माती हसते आनंदून

काही काही बदलत नाही…. त्वेषाने वा प्रेमाने
जन्मानंतर अजून तसेच मरण येते इमाने

आकाशाचे देणे काही आज उद्यात फिटत नाही
आणि इतक्या लवकर होईल प्रलय असे काही वाटत नाही

Monday, 17 January 2011

सदा"फुली"....

का, कोणास ठाऊक... पण कधी-कधी मनाला खूप यातना होत रहातात... कसल्या.. कोणामुळे.. कशासाठी हे सारे माहित असतं.. पण सांगावेसे नाही वाटत. कधी माणसे तुटू नयेत म्हणून, कधी माणसे पुन्हा जोडाविशी वाटत नाहीत म्हणून... अन्‌ कधी-कधी आपली म्हटली जाणारी माणसंसुद्धा जर आपल्या यातना ओळखू शकत नसतील तर ... ! म्हणून....
पण यातना होत रहातात.. त्रास होत रहातो.. संवेदनशील मन जपल्याचा, जाणिवा जोपासल्याचा पश्चात्ताप होतो...
आपण निरुपाय होत असल्याची जाणीव मनाला पोखरते...

पण, कदाचित त्याहीपेक्षा आपण आपल्याच माणसांना नकोसे झालो आहोत... किंवा निदान त्यांना आता आपल्याबद्दल पूर्वी सारखी ओढ राहिलेली नाही हे पचविणे वेदनादायी असते... मनाची ही "समोरच्याचे मन ओळखण्याची क्षमता नसती तर बरं" असे वाटू लागते... आपले म्हणजे नेमके काय .. नेमके कोणाला म्हणावे.. त्याची व्याप्ती कोठपर्यंत.. त्यांच्याशी कसे वागावे.. कसे बोलावे... आणि आपल्या माणसांसमोरही निरागसपणे वागण्याचे "स्वातंत्र्य" वापरावे किंवा नाही अशा असंख्य प्रश्नांनी मन पोखरले जाते.. त्रास होतो.. उमेद मरते.. पण, आयुष्य थांबत नाही.. संपत नाही.. किंबहुना मनासारखे ते अडखळतही नाही... म्हणजे आपले आयुष्यही "आपले" असल्यासारखे वागत नाही.. या साऱ्या चक्राचा चालक कोण ? नियती.. परमेश्वर.. आत्मन्‌.. काहीच कळत नाही...
पण, अगदी जीव उडतो सगळ्यांवरून... या विश्वात कोणी कोणाचं नसतं, या विधानातील सत्यता पटते आणि त्याचवेळी प्रेम,प्रेमातून येणारा अधिकार, त्यातून येणारी सहजता,निर्माण होणाऱ्या अपेक्षा-भावनांच्या अभिव्यक्तींचे स्वातंत्र्य, नैसर्गिकता , फुलणारे व्यक्तिमत्व अशा आपल्या श्रद्धांना वैफल्याचे ग्रहण लागते..

कित्येकदा अत्यंत जवळच्या माणसांकडून वापरले जाणारे शब्द टोकाचे बोचरे असतात.. त्यातील अर्थ आणि त्यामागची भूमिका यांपेक्षा त्यातील टोमणा अधिक जहाल असतो.. अगदी आपल्या अस्तित्वाच्या प्रयोजनाबद्दल आणि आपल्या भुमिकांच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा तो टोमणा नाही पचत.. नाहीच पचत.. आणि का पचवावा याचे कारणही दृष्टीपथास येत नाही.. अंतःकरणाची आग मात्र होत राहाते.. जखम भळभळत रहाते... कधी न भरून येणारी.. अश्वत्थाम्यासारखी...!

आणि मानवी मन तरी किती हळवे असते नाही..! संवाद झाला तर असे वेदनदायी शब्द ऐकून व्याकूळ होते.. संवाद थांबवला तर संवाद होत नाही म्हणून व्याकूळ होते.. सहनशील अंतःकरणाने सारे पचवायचे म्हटले तर एकाग्रता-बौद्धिक क्षमता-सर्जनशीलता-गुणात्मकता अशा बाबींवर नकारात्मक परिणाम होत रहातो...
खरंच, त्या वेद आणि उपनिषदकर्त्यांची शाबास म्हटली पाहिजे... कोणातही अगदी पालकांपासून-प्रेयसी/पत्नी/मुले अशा कोणातही मन न गुंतवणे यातच यशस्वी जीवनाचे रहस्य सांगितले आहे त्यांनी ! त्यासाठी मनोनिग्रह आणि दृढ निश्चय ही साधने त्यांनी सुचविली आहेत..
खरंच, आपण कोणालाही नको आहोत, ही भावना किती भयंकर असेल नाही.. ! 
खरे तर असे नसते.. आपण कोणालाही नको असतो असे होत नाही.. असं म्हणतात की "या विश्वाच्या पसाऱ्यात आपण एक लहानशी व्यक्ती असतो हे खरे आहे... पण अशाच एखाद्या व्यक्तीचे उभे विश्व आपल्यात सामावलेले असू शकते..." म्हणजेच आपलेही विश्व अशाच एखाद्या [ अथवा काही..] व्यक्तीच्यात सामावलेले असू शकते.. आणि अशांपैकी एखाद्या व्यक्तीला आपण नकोसे झालो आहोत हे आपल्याला जाणवते तेव्हा आपल्याला जणू असे वाटते की आपण कोणालाही नकोसे झालो आहोत...
गंमत म्हणजे त्या व्यक्तीला आपण नकोसे झालो आहोत हे आपल्याला कसे जाणवते... तर आपल्या त्या व्यक्तीकडून असणाऱ्या प्रतिसादाच्या अपेक्षेला साजेसा प्रतिसाद आपल्याला मिळाला नाही की... म्हणजे.. याचे ही मूळ आपल्या अपेक्षेतच आहे तर ! म्हणजे आता आपल्या माणसांकडूनही कोणत्याही अपेक्षा न बाळगणे गरजेचे.. अधिकार-नैसर्गिकता-प्रांजळ अभिव्यक्ती या साऱ्यांवर "फ़ुली"  [सदा"फुली"....]  यातच जीवनाचा आनंद आहे..!
हे समजले... पण जमेल ? Can I... ? Can WE ..?

Thursday, 16 December 2010

हे चक्र भेदता येईल काय ?

कायद्याचे पालन करणारा पापभिरू सामान्य नागरिक... कुटुंबाची परवड करूनही शक्यतो कायदेभंग न करू शकणारी ही मंडळी... समोर कायद्याचे नियमित उल्लंघन करणाऱ्यांनी उभी केलेली आव्हाने... क्लिष्ट आणि गुंतागुंतीची विधीप्रक्रिया... न्यायमंडळे आणि कायद्याच्या संरक्षकांकडून संरक्षण मिळायची शक्यता जवळ-जवळ शून्य... आदर्शवादी तत्वे... आणि ही आव्हाने कायद्याच्या चौकटीतूनच सोडवायचा पर्याय..... याची परिणती म्हणजे सातत्याने येणारी निराशा आणि हतबलता....

       दैनंदिन जीवनात, प्रवासात, मनमोकळ्या गप्पा मारताना समाजात एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवत आली... आपण सगळेच अन्यायाच्या एक दुष्टचक्रात अडकलो आहोत. हे चक्र अभेद्य आहे का ? निश्चितच नाही. मग या चक्रामधून मुक्त होणाऱ्यांपेक्षा, या चक्रामध्ये अडकणाऱ्यांची संख्या अधिक का असावी ? या प्रश्नाने माझा बराच पिच्छा पुरवला होता, आजही यावर मला फार काही अधिकाराने बोलता येईल अशातला भाग नाही. पण कुठेतरी या चक्राच्या अभेद्यतेमागील एक कारण मला जाणवले.... Actually, the reason behind this is, we are fighting with ill-legal elements "legally"... आपण बेकायदेशीर समाजघटकांशी आणि अडचणींशी कायद्याच्या चौकटींतून लढायचा प्रयत्न करतो आहोत...


     मूळात कायदा हा संपूर्ण मानवी वर्तन नियंत्रित करूच शकत नाही. कारण परिस्थिती सापेक्ष मानवी प्रतिसाद हे बदलते असतात, परिवर्तनशील असतात. अशा संभाव्य प्रतिसादांची शक्यता लक्षात घेऊन सार्वकालिक आणि शाश्वत कायदे तयार करणे हे जवळ-जवळ अशक्य आहे. मग, अशा कायद्याच्या मदतीने बेकायदेशीर घटकांचा पराभव करणे हे कसे शक्य होईल ?


      त्यात आजही सामान्य माणसे लढताना दिसत नाहीत अशी तक्रार असते... माझीही ही तक्रार आहे.. आता हेच पहाना...

      शीतपेयांच्या बाटल्या विकत घ्यायच्या झाल्या द्या १-२ रुपये अधिक... बसचे तिकीट काढायचे झाले, वाहकाजवळ सुट्टे नाहीत, घालवा काही रुपये.. रेल्वे वाहतूकीचा पर्याय स्विकारावा तर प्रत्येक गाडी किमान १५-२० मिनीटे उशीराने धावते.. घरचा दूरध्वनी संच महिना-महिना बंद असतो पण बिलातील स्थिर मासिक आकार मात्र भरावाच लागतो.. पेट्रोलचे भाव एका वर्षात १६ रुपयांनी वाढतात आणि तेही जागतिक बाजारपेठेत या उत्पादनांचे भाव तौलनिक दृष्ट्या तसे स्थिर असताना.. मोबाईल कंपन्यांच्या "कस्टमर केयर"ला कॉल केला असता आपण कित्येक मिनीटे "प्रतिक्षेत" असतो, परिणामी आपले बिल हकनाक वाढते.. कुरियर कंपन्यांच्या पावत्यांवर "आतील वस्तू गहाळ झाल्यास आम्ही जबाबदार नाही" असे लिहिलेले असते आणि त्यावर आपल्याला सही करावी लागते.. आपण ती मुकाट्याने करतोही... पण आपण भांडतो का ? आपण पेटून उठतो का ? [माझी एक फॅंटॅसी आहे की सहज एखादवेळी हे ग्राहकाने म्हणावे.. की या बिलातील रक्कम देताना रुपयाच्या नोटा खोट्या आल्यास आम्ही जबाबदार रहाणार नाही... चालेल का ?]


     दैनंदिन जीवनात आपल्या विरोधात असंख्य घटना घडतात.. आपल्यावर प्रचंड अन्याय होतो.. आपण कायद्याच्या चौकटी पाळत असतो मात्र तरिही कायद्याची आपल्यालाच भिती वाटत रहाते.. खिशात योग्य किंमतीचे तिकीट असतानाही समोर तिकिट तपासनीस आला की आपल्या उरातील धडधड वाढते. आणि आश्चर्य म्हणजे आपल्याला या साऱ्याचा त्रास होत नाही.. चिडचिड होत नाही.. हीच माझी अस्वस्थता आहे... की का ? आपण का चिडत नाही ? आपण का बंड करत नाही ? आपण का लढत नाही ? आपण अधिकाधिक निष्क्रिय होतो, हतबल होतो... पण आपण संतापत नाही.. आणि यात मी ही आलोच... मला याची लाज वाटते..


     पण लाज वाटल्याने परिस्थिती बदलत नाही. हे असे का होत असावे याचाही विचार झालाच पाहिजे. मला जाणवते की बहुधा वाढते "बॅटल फिल्ड" हे याचे कारण असू शकेल... की अगदी घरातून बाहेर पाऊल टाकल्यापासून प्रत्येक श्वासासाठी लढावे लागणे आणि नैतिक दृष्ट्या योग्य वागूनही, कायदेशीररित्या बरोबर असूनही न्याय न मिळण्याचीच शाश्वती असणे यामुळे "पेटण्याऐवजी" सामान्य माणूस "विझत" असावा.. असे म्हटले तर मग आपल्यावरील जबाबदारी अधिक वाढते. कारण अशा वेळी आपण "बॅटलफील्ड" कमी करण्यासाठी काय करता येइल याचा विचार करायला हवा.

आपल्याला जमेल ? can we..?

Wednesday, 1 December 2010

अरुंधती, लिऊ झिओबो आणि ज्युलियन अ‍ॅसेंज.....

   बुकर पारितोषिक विजेती लेखिका, नोबेल शांतता पुरस्कार २०१० विजेता आणि विकीलिक्स्‌चा मालक..एकाच रेषेत ही नावे पहाताना आश्चर्य वाटले असेल ना... ?

पण या साऱ्यांमध्ये काही साम्यस्थळे आहेत... या तिघांनाही वेगवेगळ्या संदर्भात पण "अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा" वापर केल्याबद्दल शिक्षेला अथवा शिक्षेच्या शक्यतेला सामोरे जावे लागत आहे... इतकेच नाही... तर हे सर्वच जण महासत्ता होण्याचे "potential" असणाऱ्या देशाने घटक आहेत.. आणि गंमत म्हणजे योगायोगाने तिघांनीही आपापल्या अभिव्यक्तींनी आपापल्या [ असेंज चा अपवाद ! ] राष्ट्राच्या प्रतिमेला निश्चितच तडा दिला आहे, शिवाय आपापल्या राष्ट्राच्या "परराष्ट्र संबंधांना" आव्हान दिले आहे... मात्र, चीन मधील "totaliterian" व्यवस्थेबद्दल आसूड ओढणारा आणि जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी पडेल ती किंमत देऊन लढणारा लिऊ, "शासन हा जनताविरोधी कट असतो" या विचारांवर श्रद्धा असणारा ज्युलियन एकिकडे अन्‌ ऐतिहासिक सत्याचा स्वीकार न करणारी आणि शिवाय भारतीय शासनाच्या कार्यपद्धतीबद्दल अभ्यासशून्य शंका उपस्थित करणारी अरूंधती रॉय दुसरीकडे....   


पण आज हे सारे आठवायचे कारण.....
            विकीलिक्स्‌ने जाहीर केलेल्या "केबल गेट्स"मुळे अमेरिकेतील सरकारी गोटात चांगलीच अस्वस्थता पसरली आहे. विशेष म्हणजे अमेरिकेला आपल्या परराष्ट्र संबंधांची काळजी वाटू लागली आहे. काही सरकारी अधिकारीही "प्रत्येक देशाचे राजदूत/ मुत्सद्दी आणि परराष्ट्र सेवेतील अधिकारी गुप्तहेर म्हणून वावरतात" असे स्पष्टीकरण देवू लागले आहेत. अमेरिकेचे अ‍ॅटर्नी जनरलही काल ".. अशी गोपनीय कागदपत्रे उघड करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केले जाईल, किंबहूना कायद्यात तरतूदी नसतील तर कायद्यात दुरुस्त्या करून शिक्षा केली जाईल.." असे म्हणाले... व्यक्ती स्वातंत्र्य- अभिव्यक्ती स्वातंत्र्य - पारदर्शकता आदी मूल्ये जगाला शिकवणाऱ्या या महासत्तेलाच आता स्वतःच्याच विचारधारेविरुद्ध लढावे लागणार आहे. मला व्यक्तीशः या वृत्ताचे आणखी काही पदर जाणवले...


१] गेली काही शतके आपल्या धोरणांनुसार जगाला नाचवणाऱ्या या देशाला इतके वर्षांत कधीही परराष्ट्र संबंधांची तमा बाळगावीशी वाटल्याचे पहाण्यात नाही.. उलट असलाच तर त्यांत एक उद्दामपणाच असायचा, की अन्य देशांनी आपले परराष्ट्र धोरण अमेरिकेच्या "हिडन हॅंड" मार्गदर्शनाद्वारे ठरवावे... आता ही परिस्थिती खरोखरच बदलली असेल का ? आणि असेलच तर कशाने ?


२] अमेरिका हा देश म्हणून वाचताना मला त्यांचे एक कौशल्य जाणवले. हा देश एक उत्तम "मार्केटींग" तंत्र जाणणारा देश आहे. कारण, सातत्याने या देशाने त्यांच्या समस्या याच जगाच्या समस्या असल्याचे प्रभावीपणे भासवले आहे. मग ती समस्या ग्लोबल वॉर्मिंगची असो, दहशतवादाची असो, आर्थिक महामंदीची असो, रोजगारजन्यतेची असो, चारित्र्याची असो, मानवी हक्कांची असो वा लहान मुलांच्या आरोग्याची असो... विशेष म्हणजे, या समस्येची कारण त्याच देशाची चुकलेली संकल्पना आणि धोरणे होती... पण अमेरिका मार्केटींग कंपनीने कारणे आणि उपायही जगासमोर अशा पद्धतीने मांडले की जणू जगाला "ते" "आपलेच" वाटावेत.. आणि म्हणूनच विकीलिक्स्‌ नंतरची या देशाची प्रतिक्रिया आता पहाणे महत्त्वाचे तसेच मनोरंजकही आहे.

३] स्वातंत्र्य हा अमेरिकेचा वैचारिक पाया आहे. या देशाचा विकास, त्यामागील भांडवलशाही धोरण स्वातंत्र्य, प्रसारमाध्यमांच्या भूमिका, दूरचित्रवाणी वरील दैंनंदिन मालिका- रिअ‍ॅलिटी शोज्‌ - बातम्या आदी सर्वच क्षेत्रांत आढळणारा समान घटक म्हणजे स्वातंत्र्य.. आणि याच मुद्द्यावर या देशाने आपले अस्तित्व टिकवले आहे. आता जेव्हा याच देशाच्या विविध धोरणांमागील भूमिका "Conspiracy as Governance" अशी विचारधारा असणाऱ्या ज्युलिअन अ‍ॅसेंज याने मांडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याच्यावर व्यक्ती-अभिव्यक्ती आणि विचार स्वातंत्र्य जपणाऱ्या या देशाकडून काय कारवाई होते आणि कोणत्या मुद्द्यांवर होते ते पहाणे उद्बोधक आहे. जगभरातील विविध देशांना मानवी हक्क आणि स्वातंत्र्याचे धडे देणाऱ्या देशाकडून या विषयावर दिली जाणारी प्रतिक्रिया या दृष्टीने महत्त्वाची आहे.


४] १९८० पर्यंत तत्कालीन सोव्हियत रशिया हा सातत्याने विकासाच्या पायऱ्या चढत होता, असे निदान कागदावर तरी दिसत होते. प्रत्यक्षात मात्र "जॉर्जिया" मध्ये पोपनी केलेल्या विधानानंतर "floodgates were opened... & the rest is history...". तात्पर्य,  "सारे काही आलबेल आहे" असे सांगणाऱ्या देशात तसे खरेच असेल असे मानायचे कारण नाही. आजवर अमेरिका हा जागतिक दृष्टीकोनातून "जगण्याचा मानबिंदू" मानला जाणारा किंवा निदान मानबिंदू म्हणून ज्यांच्या कल्पना स्विकारल्या जातात असा देश होता. आता विकीलिक्स्‌, ग्राउंड झिरोवर मशीद उभारणे, रोजगार विषयक समस्या, आर्थिक संकट या पार्श्वभूमीवर हा मानबिंदू बदलला जातो का किंवा निदान अशा वेळी अमेरिका आपली प्रतिमा कशी टिकवते, हे पहाणे गरजेचे आहे. शीतयुद्धास कारणीभूत असणाऱ्या दोन महासत्ता भिन्न मार्ग आणि वैचारिक बैठक असूनही जवळ-जवळ एकाच मार्गावर पोहोचल्याचे दिसत आहे...


५] याच पार्श्वभूमीवर चीन आणि भारत या संभाव्य महासत्तांकडे पहाणे गरजेचे आहे. कारण याही दोन्ही देशांची विचारधारा भिन्न आहे, दोन्ही देशात विद्यमान परिस्थितीबद्दल अस्वस्थता आहे, एक देश रशियाच्या कम्युनिस्ट विचारप्रणालीशी जुळणारा तर दुसरा "लोकशाही समाजवादी" म्हणजे तत्वतः कोणत्याच विचारधारेशी बांधिलकी नसणारा अथवा "तथाकथित" synthesis वादी... त्यामुळे इतिहासातील दोन महासत्तांच्या अस्तानंतर साधारण त्याच पायावर पुढील महासत्तांची वाटचाल काय असेल याचे आडाखे बांधता येणे गरजेचे आहे. किंबहून ज्या देशाला हे जमेल, आणि त्यानुसार संभाव्य धोके neutralise करता येतील तो निश्चितपणे जागतिक स्पर्धेत टिकाव धरेल आणि जिंकेलही... !


६] याच विषयाचा मला जाणवणारा आणि खरे म्हणजे वेदना देणारा घटक आहे तो बराक ओबामा यांच्या अस्तित्वाबद्दल.. ओबामा यांची भूमिका भारताच्या दृष्टीकोनाचा विचार करता "उपयुक्त" नसेलही, किंबहूना ती भारताच्या "हितसंबंधांना मारकही असू शकेल" ... [ It might be spoiling Indian National Interests.. ] पण, ओबामांचे निर्णय हे अमेरिकेचा विचार करता फार दूरदर्शी म्हणावे लागतील... { मला तुलनेचा मोह आवरत नाही.. ओबामा यांच्या सध्याच्या भूमिका मला थेट गोर्बाचेव्ह यांच्या "ग्लासनोस्त" आणि "पेरेस्त्रॉयका" यांसारख्या वाटतात.. राष्ट्राच्या मूळ विचारधारेशी थेट फारकत घेणाऱ्या..!} मात्र, जॉर्ज बुश यांची फसलेली धोरणे, ओबामा यांची मुस्लिम आणि कृष्णवर्णीय पार्श्वभूमी, संकटांचा सामना प्रतिसाद पद्धतीने [ reactively ] करण्याची अमेरिकेच्या नागरिकांना नसलेली सवय, इराक-अफगाण युद्धे, recession आणि राष्ट्राध्यक्ष म्हणून ओबामा या आदर्शवादी माणसाकडून असलेल्या अपेक्षा यांचा फार मोठा फटका या "शांतता" पुरस्कार विजेत्याला बसल्यावाचून रहाणार नाही. आणि पुन्हा एकदा खरोखरीच देशाबद्दल प्रांजळ हितभावना असणाऱ्या माणसाला आपल्या पदाची किंमत मोजायला लागणार हे स्पष्ट आहे.. [ कधी-कधी तर हा मला रिपब्लिकांनी ’डेमोक्रॅट्स, विरुद्ध आखलेल्या नव्या "धोरणा"चाच भाग वाटतो..] पण "वॉटरगेट" प्रकरणाप्रमाणेच या "केबलगेट" प्रकरणाचा ओबामा यांच्या राजकिय कारकिर्दीवर होणारा परिणाम पहावा लागेल... आणि एक, जगातील लोकशाहीचा "कट्टर" पुरस्कर्ता मानला जाणाऱ्या देशात तळागाळातून वर येणाऱ्या- स्वच्छ आणि प्रामाणिक राजकारण्याचे भविष्य जर अंधःकारमय होणार असेल, त्याच्या राजकिय कारकिर्दीसमोर जर प्रश्नचिन्ह उभे रहाणार असेल तर अन्य देशात विशेषतः भारतात काय होईल याचा विचार करावा लागेल ?


७]  कार्ल मार्क्स हे थोर विचारवंत होते.. उभे जग भांडवलवादाच्या “तावडीत” असेल तेव्हाच हे तत्वज्ञान सर्वाधिक लागू होते किंवा तशी शक्यता निर्माण होते, असे त्यांनीच म्हणून ठेवले आहे.... मग या न्यायाने तर मार्क्सवादाचा सर्वात जास्त प्रभाव अत्ताच्या जगावर पडणे अपेक्षित आहे..  जागतिक धोरणांवर समाजवादाचा प्रभाव असणे ही गरज आहे..

... अशा वेळी "उदारीकरण-खासगीकरण आणि जागतिकीकरण" [ LPG ] याच मुद्यांना चालना देणे हे पचवता येणारे आहे का , याचाही गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. वाढता भांडवलवाद, कॉर्पोरेट जगत, जाहिराती, ग्राहक-विक्रेता नातेसंबंध असे सारे बदलते आयाम [dimension] मानवाला तारू शकतील का, हे तपासणे गरजेचे आहे... याचा विकीलिक्स्‌शी संबंध काय असा प्रश्न कदाचित आपल्या मनात येवू शकतो.. तर लक्षात घेऊया, शेवटी ही सुद्धा एक वेबसाईट आहे... [ संकेतस्थळ !!! ] याला सुद्धा व्यवसाय आहे.. येथेही "मागणी-पुरवठा" तंत्र आहे... या संकेतस्थळालाही ग्राहक आहेत.. त्यावर त्यांना मिळणाऱ्या जाहिराती अथवा पुरस्कर्त्यांचे प्रमाण अवलंबून आहे.. यातही स्पर्धा आहे.. धोके आहेत.. आधी कोण ही उत्कंठा आहे... म्हणजेच विकीलिक्स्‌ला सुद्धा ग्राहक-विक्रेते हा आयाम आहेच...! आणि म्हणूनच समाजवाद आणि भांडवलवाद यांच्यातील द्वंद्वाचा एक नवीन "Angle" या विषयामुळे जगासमोर येण्यास मदत होईलच....!


मला एक विनोद आठवतो....
निकिता क्रुश्चेव्ह सोव्हियत रशियाचे प्रमुख होते. ते स्वतःच हा किस्सा सांगत असत.
एकदा क्रेमलीनच्या राजवाड्यात एक माणूस जोरजोरात ओरडत शिरला : "क्रुश्चेव्ह मूर्ख आहे.. क्रुश्चेव्ह मूर्ख आहे.. "
त्या माणसाला ताब्यात घेण्यात आले.. त्याच्यावर खटला भरण्यात आला व त्याला तेवीस वर्षांची शिक्षा देण्यात आली. निकिता क्रुश्चेव्ह यांनी हा किस्सा सांगितला की, ऐकणारा स्वाभाविकच प्रश्न विचारत असे... तेवीस हा काय हिशोब ? ३-५-१०-२० असे शिक्षांसाठीचे आकडे ज्ञात आहेत, पण २३ ?
क्रुश्चेव्ह हसत उत्तर देत..." Yes 23... Three years for insulting a National Party Secretary.. & 20 years for revealing the Greatest Secret of USSR "...

बहुधा विकीलिक्स्‌च्या ज्युलियन अ‍ॅसेंजलाही शिक्षा झालीच तर ती.......!!