फार झालं !
फार झालं !!
जगण्याचं दुःख अनिवार झालं...
एक देश, एक धर्म
तत्वाने या फाळणी झाली...
पुण्यपुरातन देशाची मात्र,
षंढ नेतृत्वा "हाती" चाळणी झाली !
चाळणीच्या प्रत्येक भोकाचं
आता अगदी भगदाड झालं !!
फार झालं... फार झालं...
स्वतंत्र भारताची
कसली ही परराष्ट्र निती ?
राष्ट्रीय हितसंबंधांनाच
देते जी मूठमाती !
संवेदनशून्य शासनवेदीवर
भारताच्या भव्यतेचं स्वप्नंही ठार झालं..
फार झालं.. फार झालं..
टंचाई-महागाई घेते,
आम आदमीच्या घामाचे घोट..
तोयबा-३१३- मुजाहिद्दीन कृपेने
दिवस रात्र घडती स्फोट
सभ्यतेच्या बुरख्याआड निष्क्रीयता,
हेच देशाचं जणू अनिवार्य "स्पिरिट" झालं !
फार झालं... फार झालं...
ना सौभाग्याची खात्री,
ना मरणाचे सुतक...
नकाशारहित प्रवासाने ,
जीवन झाले तुटक-तुटक...
प्रसारमाध्यमं-राजकारण्यांचं स्वार्थी मन,
राष्ट्रीय "क्रायसिस"वर स्वार झालं...
फार झालं.. फार झालं...
ठेवून द्यावी एकच थप्पड,
अतिरेक्यांच्या थोबाडावर..
गाडून थडगे, राष्ट्रद्रोह्यांचे
वरून थुंकावे त्याच्यावर...
"ठकासी असावे महाठक" हवा बाणा !
मोडक्या कण्यांनी जगणं बस्स झालं...
फार झालं... फार झालं ...
जगण्याचं दुःख अनिवार झालं !!!
काल पुन्हा एकदा निदान "प्रसारमाध्यमांतून" तरी मुंबई हादरली... नाही तरी मुंबईला काय ! फटाके, गॅस सिलेंडर आणि RDX सारखेच. फक्त प्रत्येकाचा संदर्भ वेगळा. ते नाही का... गुलाबाचंच फुल, पण देवाला वाहिलं की भक्तीचं प्रतिक, प्रेयसीला दिलं की प्रेमाचं आणि मृतदेहावर वाहिलं तर श्रद्धेचं... काहीसा तसाच मामला आहे हा स्फोटाचा निदान मुंबईकरांसाठी तरी.. अस्सं "मुंबई स्पिरिट" म्हणणाऱ्यांना वाटतं..
आणि आम्ही सुद्धा स्वाभिमान डिवचल्यासारखे.. संतापल्यासारखे वागत नाही...
आम्ही शांतच !
प्रसारमाध्यमं नेहमीसारखीच स्फोटाचा "इव्हेंट" कॅच करण्यासाठी तत्पर झाली होती. स्फोट किती वाजता झाला... स्फोटके नेमकी कशात होती...[ हा प्रश्न मुंबईच्या पोलिस आयुक्तांना एका पत्रकाराने विचारला आणि त्यांनीही साळसूदपणे "ती बहुधा छत्रीत होती", असं उत्तर दिलं.. या पत्रकाराला खरे तर पोलिस आयुक्तांनी स्फोटकं माझ्या खिशांत होती.. मीच ती सहज म्हणून आयुक्तालयातून ऑपेरा हाऊस येथे टाकली, असंच सांगायला हवे होते.. !] प्रत्यक्षदर्शींना काय वाटलं... त्यांनी नेमकं काय पाहिलं.. [ त्यांनी खरे तर ब्रिटनी स्पियर्सला नाचताना पाहिलं होतं ना कबुतरखान्याजवळ !] असे प्रश्न पत्रकार "संवेदनशीलते"ने विचारत होते. यादेशाचे गृहमंत्री सुद्धा या स्फोटांच्या तपासासाठी दिल्लीहून एका विशेष विमानाने NSG ची तुकडी मुंबईला आल्याचे सांगत होते.
आणि एकालाही हे लक्षात येवू नये की, NSG हा युद्धजन्य परिस्थितीत लढणारा गट आहे. त्याचा तपासाशी काय संबंध ? आणि म्हणूनच या तुकडीला विशेष विमानाने मुंबईला पाठविण्याचा खर्च का केला गेला, असा प्रश्न विचारण्याचे कोणासही सुचले नाही..
आम्ही शांतच...
गेली ६५ वर्षे एक देश सातत्याने आपल्या कानाखाली आवाज काढतो आहे.. आपल्याला बुद्धीसामर्थ्याने झुंजवितो आहे आणि आमचे परराष्ट्र विभागाचे अधिकारी.. गृहमंत्री आदी मंडळी या देशाला "दहशतवादाचा अड्डा" किंवा "दहशतवादी कृत्यांचा तीव्र निषेध"या पलिकडे काहीच म्हणत नाहीयेत. पाकिस्तानच्या मुस्काटात ठेवून द्यायला हवी असे प्रत्येक नागरीकालाच वाटते. पण असा दबाव निर्माण करताना... मेणबत्त्या लाऊन आम्ही शांतच...
माझे मूळात काही प्रश्न आहेत... बहुधा माझ्यापुरते सुस्पष्ट आणि उत्तरे तयार असणारे... पण तरीही ते विचारायचा मोह आवरत नाहीये...
१] देशाचे कानफाट सुजेपर्यंत आपल्या शेजारच्या देशाने भारतात स्फोट घडवून आणले आहेत. पण आपल्याला त्यांच्या कानाखाली प्रोअॅक्टीव्ह जाळ काढणे अजूनही शक्य झालेले नाही यामागील कारणे नेमकी कोणती ?
अ] राजकीय औदासिन्य
ब] आंतरराष्ट्रीय कायदा आणि संकेत
क] भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा
ड] परराष्ट्र धोरणाचा अभाव की
ई] देशांतर्गत सुरक्षिततेचा प्रश्न
[ म्हणजे, समजा उद्या आपण युद्ध पुकारले तर, भारतातील ८-१० शहरांत एकाच वेळी २६/११ सारख्या घटना पाक युद्धकाळातही घडवून आणू शकेल ही भिती !]
२] ईस्राईल आणि अमेरिका २००८ पासून भारतीय हवाई तळांचा वापर करून पाकमधील अतिरेक्यांचे बेस उडवायला तयार आहेत. मग "डिप्लोमॅटिकली" पाहुण्याच्या चपलेने विंचू मारण्याची आपली तयारी अजूनही का नाही ?
३] मकबूल भट या काश्मीरी अतिरेक्याच्या सुटकेसाठी बर्मिंगहॅम येथील भारतीय उच्चायुक्त असणाऱ्या रवींद्र म्हात्रे यांची हत्या केली गेली. त्यांचा मृतदेह विदृप करून भारतात पाठविला गेला. त्याचा बदला म्हणून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भट याच्या संदर्भातील कागदपत्रे पूर्ण करून अवघ्या ८ दिवसांच्या आत त्याला फासावर लटकावले. ही अशी निर्णयक्षमता दाखविण्यात आपण का कमी पडतो आहोत ?
४] फाहिम अन्सारी आणि सय्यद सबाउद्दीन या मुंबई रेल्वे स्फोटांपासून जाळ्यात अडकलेल्या गुन्हेगारांना आपण आणि आपली न्यायव्यवस्था काहीही शिक्षा का करू शकलेली नाही ?
५] प्रसारमाध्यमांतून हे प्रश्न का विचारले जात नाहीत ?
६] भारतात उद्या "WEDNESDAY" सारख्या चित्रपटाची वास्तववादी आवृत्ती निपजल्यास भारत अंतर्गत सुरक्षितता सांभाळू शकणार आहे का ?
७] स्फोटांच्या बातम्या कशा हाताळल्या जाव्यात, त्यांचे संकलन-प्रसारण कसे केले जावे, अशा घटनांशी संबंधित पत्रकार परिषदांना कसे सामोरे जावे.. कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारावेत.. पिडीतांशी कसे बोलावे यासंबंधातील किमान संवेदनशील प्रशिक्षण झालेला पत्रकारच अशा स्वरुपाच्या घटना हाताळेल, हे पहाण्यासाठी सरकारने कोणती पावले उचलली आहेत का ?
८] "कामाशिवाय घराबाहेर पडू नका" या सरकारी सुचनेचा अर्थ काय होतो ? मुंबईकर सुट्टी नसताना, गर्दीच्या वेळात टाईमपाससाठी घराबाहेर पडतो असे शासनास सुचवायचे आहे का ?
९] आज भारतात इतके स्फोट झाले. पी.चिदंबरम आणि आबा पाटील या कंपनीनेही अनेक दहशतवादी घटना हाताळल्या. तरीही अजून या देशाच्या मंत्र्यांना घटनेशी संबंधित बोलताना [ ज्यात कोणाचेही नांव अथवा राजकीय दृष्ट्या अडचणीत आणणारे उल्लेख नसतात ] लेखी परिपत्रक का लागते ? त्यांना उत्स्फुर्तपणे योग्य-न्याय्य आणि मुत्सद्दीपणे बोलता येत नसेल तर त्यांना मंत्रीपद का दिले जाते ? आणि प्रसारमाध्यमे याबाबत मौन का पाळतात ?
१०] गुप्तहेर खात्याचा छोटा राजन मार्फत दाऊदशी शह-काटशहाचा खेळ चालू असतो. मुंबईचा पोलिस आयुक्त बदलतो आणि दाऊदविरुद्ध तीव्र होणे गरजेचे असणारी मोहीम छोटा राजन विरुद्ध तीव्र होते. आणि त्यात पोलिस दलातील काहींना पकडले जाते. आणि त्यानंतर स्फोट घडून येतात याचा अर्थ काय ?
या साऱ्या प्रश्नांची उत्तरे एक निरिक्षक म्हणून जाणवतात... कळतात...
म्हणूनच वाटतं...
फार झालं.. फार झालं..
जगण्याचं दुःख अनिवार झालं...
हे चित्र बदलता येइल ?