का, कोणास ठाऊक... पण कधी-कधी मनाला खूप यातना होत रहातात... कसल्या.. कोणामुळे.. कशासाठी हे सारे माहित असतं.. पण सांगावेसे नाही वाटत. कधी माणसे तुटू नयेत म्हणून, कधी माणसे पुन्हा जोडाविशी वाटत नाहीत म्हणून... अन् कधी-कधी आपली म्हटली जाणारी माणसंसुद्धा जर आपल्या यातना ओळखू शकत नसतील तर ... ! म्हणून....
पण यातना होत रहातात.. त्रास होत रहातो.. संवेदनशील मन जपल्याचा, जाणिवा जोपासल्याचा पश्चात्ताप होतो...
आपण निरुपाय होत असल्याची जाणीव मनाला पोखरते...
पण, कदाचित त्याहीपेक्षा आपण आपल्याच माणसांना नकोसे झालो आहोत... किंवा निदान त्यांना आता आपल्याबद्दल पूर्वी सारखी ओढ राहिलेली नाही हे पचविणे वेदनादायी असते... मनाची ही "समोरच्याचे मन ओळखण्याची क्षमता नसती तर बरं" असे वाटू लागते... आपले म्हणजे नेमके काय .. नेमके कोणाला म्हणावे.. त्याची व्याप्ती कोठपर्यंत.. त्यांच्याशी कसे वागावे.. कसे बोलावे... आणि आपल्या माणसांसमोरही निरागसपणे वागण्याचे "स्वातंत्र्य" वापरावे किंवा नाही अशा असंख्य प्रश्नांनी मन पोखरले जाते.. त्रास होतो.. उमेद मरते.. पण, आयुष्य थांबत नाही.. संपत नाही.. किंबहुना मनासारखे ते अडखळतही नाही... म्हणजे आपले आयुष्यही "आपले" असल्यासारखे वागत नाही.. या साऱ्या चक्राचा चालक कोण ? नियती.. परमेश्वर.. आत्मन्.. काहीच कळत नाही...
पण, अगदी जीव उडतो सगळ्यांवरून... या विश्वात कोणी कोणाचं नसतं, या विधानातील सत्यता पटते आणि त्याचवेळी प्रेम,प्रेमातून येणारा अधिकार, त्यातून येणारी सहजता,निर्माण होणाऱ्या अपेक्षा-भावनांच्या अभिव्यक्तींचे स्वातंत्र्य, नैसर्गिकता , फुलणारे व्यक्तिमत्व अशा आपल्या श्रद्धांना वैफल्याचे ग्रहण लागते..
कित्येकदा अत्यंत जवळच्या माणसांकडून वापरले जाणारे शब्द टोकाचे बोचरे असतात.. त्यातील अर्थ आणि त्यामागची भूमिका यांपेक्षा त्यातील टोमणा अधिक जहाल असतो.. अगदी आपल्या अस्तित्वाच्या प्रयोजनाबद्दल आणि आपल्या भुमिकांच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा तो टोमणा नाही पचत.. नाहीच पचत.. आणि का पचवावा याचे कारणही दृष्टीपथास येत नाही.. अंतःकरणाची आग मात्र होत राहाते.. जखम भळभळत रहाते... कधी न भरून येणारी.. अश्वत्थाम्यासारखी...!
आणि मानवी मन तरी किती हळवे असते नाही..! संवाद झाला तर असे वेदनदायी शब्द ऐकून व्याकूळ होते.. संवाद थांबवला तर संवाद होत नाही म्हणून व्याकूळ होते.. सहनशील अंतःकरणाने सारे पचवायचे म्हटले तर एकाग्रता-बौद्धिक क्षमता-सर्जनशीलता-गुणात्मकता अशा बाबींवर नकारात्मक परिणाम होत रहातो...
खरंच, त्या वेद आणि उपनिषदकर्त्यांची शाबास म्हटली पाहिजे... कोणातही अगदी पालकांपासून-प्रेयसी/पत्नी/मुले अशा कोणातही मन न गुंतवणे यातच यशस्वी जीवनाचे रहस्य सांगितले आहे त्यांनी ! त्यासाठी मनोनिग्रह आणि दृढ निश्चय ही साधने त्यांनी सुचविली आहेत..
खरंच, आपण कोणालाही नको आहोत, ही भावना किती भयंकर असेल नाही.. !
खरे तर असे नसते.. आपण कोणालाही नको असतो असे होत नाही.. असं म्हणतात की "या विश्वाच्या पसाऱ्यात आपण एक लहानशी व्यक्ती असतो हे खरे आहे... पण अशाच एखाद्या व्यक्तीचे उभे विश्व आपल्यात सामावलेले असू शकते..." म्हणजेच आपलेही विश्व अशाच एखाद्या [ अथवा काही..] व्यक्तीच्यात सामावलेले असू शकते.. आणि अशांपैकी एखाद्या व्यक्तीला आपण नकोसे झालो आहोत हे आपल्याला जाणवते तेव्हा आपल्याला जणू असे वाटते की आपण कोणालाही नकोसे झालो आहोत...
गंमत म्हणजे त्या व्यक्तीला आपण नकोसे झालो आहोत हे आपल्याला कसे जाणवते... तर आपल्या त्या व्यक्तीकडून असणाऱ्या प्रतिसादाच्या अपेक्षेला साजेसा प्रतिसाद आपल्याला मिळाला नाही की... म्हणजे.. याचे ही मूळ आपल्या अपेक्षेतच आहे तर ! म्हणजे आता आपल्या माणसांकडूनही कोणत्याही अपेक्षा न बाळगणे गरजेचे.. अधिकार-नैसर्गिकता-प्रांजळ अभिव्यक्ती या साऱ्यांवर "फ़ुली" [सदा"फुली"....] यातच जीवनाचा आनंद आहे..!
हे समजले... पण जमेल ? Can I... ? Can WE ..?